गणेशोत्सव २०१९: आर्थिक मंदीमुळं यंदा २५ टक्के मंडळ कमी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

विविध उद्योगक्षेत्रांत निर्माण झालेल्या मंदीचा फटका यंदाच्या गणेशोत्सवाला बसण्याची चिन्हं आहेत. वाढती महागाई आणि मंदीमुळं उद्योग जगत आणि व्यापारीवर्गाकडून गणेशोत्सव मंडळांकडं येणारा निधीचा ओघ कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं यंदा तब्बल २५ टक्के सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणपती न बसविण्याचा निर्णय घेतला असून, काहींनी खर्चात घट केली आहे. अशातच मुंबई उच्च न्यायालय आणि सरकारनं गणेशोत्सव काळात कठोर जाहिरात धोरण आखल्यानं मंडळांना जाहिरातींमधून मिळणारा निधी मिळणंही अशक्य झालं आहे.

२५ टक्के घट

यंदा गणेशोत्सवासाठी मंडळांना मिळणाऱ्या निधीत मागील वर्षांच्या तुलनेत सुमारे २५ टक्के घट झाली आहे. तसंच, या वर्षी पूरग्रस्तांना मदत देण्यात गणेश मंडळांनी पुढाकार घेतल्यानं अनेक मंडळांना या वर्षी  आर्थिक चणचणीला सामोरं जावं लागत आहे. तसंच, कार्यकर्त्यांना देणगीवर अवलंबून राहावं लागत आहे.

सोन्याच्या भावात वाढ 

मुंबई प्रेस क्लब आणि गणेशोत्सव समन्वय समिती यांच्यावतीनं गणपती उत्सवानिमित्त पत्रकारांसोबत वार्तालाप कार्यक्रमाचं आयोजन आझाद मैदान येथील मुंबई प्रेस क्लबमध्ये करण्यात आलं होतं. त्यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश दहिबावकर यांनी आर्थिक मंदीमुळं यंदा २५ टक्के गणेश मंडळं कमी झाल्याचं म्हटलं. तसंच, सोन्याचे भाव वाढल्यानं यंदा बाप्पाच्या चरणी सोनं कमी येण्याची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलं. 

३७० कलम रद्द

काश्मीरमधील ३७० कलम रद्द केल्यानंतर देशातील मुख्य शहरांमध्ये असलेल्या ‘हाय अ‍ॅलर्ट’च्या पाश्र्वभूमीवर गणेशोत्सवात सुरक्षेसंबंधीच्या उपाययोजनांबबात यावेळी चर्चा करण्यात आली. त्यावेळी 'मंडळांनी पोलीस प्रशासनावर गणेशोत्सवातील सुरक्षिततेसाठी ताण न देता कार्यकर्त्यांनाही प्रशिक्षित करून त्यांच्यावर सुरक्षिततेची जबाबदारी देण्याचं काम केलं आहे. त्याचबरोबर मंडळांनी ‘मेटल डिटेक्टर’ आणि सुरक्षा उपकरणांची व्यवस्था केली आहे. पोलीस विभागाशी समन्वय साधून प्रत्येक मंडळाच्या काही कार्यकर्त्यांना गणेशोत्सवातील सुरक्षा व्यवस्थेसाठी प्रशिक्षित करण्यात आलं आहे. त्यामुळं गणेशोत्सव सुरळीत पार पडेल', असं नरेश दहिबावकर यांनी म्हटलं.

खड्ड्यांचा त्रास

रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा त्रास गणपती विसर्जन मिरवणुकीलाही जाणवतो. खड्डे बुजविण्याबाबत पालिकेकडे वेळोवेळी तक्रार देऊनही त्यांच्याकडून खड्डे बुजविण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नाहीत. गणेश उत्सव समितीकडून दरवर्षी पाठपुरावा करूनही पालिकेकडून आश्वासनांशिवाय आजपर्यंत कोणतेही काम झाले नाही, अशी टीका दहिबावकर यांनी यावेळी केली. 

स्टीलच्या प्लेटचा वापर

पालिकेने रस्त्यांवरील खड्डे बुजविले नसल्यानं दरवर्षी मंडळाचे कार्यकर्तेच स्टीलच्या प्लेट खड्ड्यांवर टाकून त्यावरून मूर्तीची ट्रॉली घेऊन जातात. खड्ड्यांमुळं मूर्तींना इजा होऊ शकते. याबाबत आम्ही वारंवार पालिकेकडं पाठपुरावा करतो. मात्र ते स्वत:ही खड्डे बुजवत नाहीत आणि कार्यकर्त्यांनाही ते काम करू देत नसल्याचा आरोपही दहिबावकर यांनी या वेळी केला.


हेही वाचा -

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मंगळवारी लागणार निकाल


पुढील बातमी
इतर बातम्या