Ganesh Utsav 2020 : मुख्यमंत्र्यांकडून गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर, लक्षात ठेवा 'हे' १० नियम

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

गणेशोत्सव म्हटला की राज्यात मोठी धूम असते. पण यंदा उत्सवावर कोरोनाचं संकट असल्यामुळे गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीनं साजरा करण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.

यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियमावली हाजीर केल्या आहेत. यावर मुख्यमंत्र्यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. यानुसार राज्यात गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

  • गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळाकरिता ४ फूट आणि घरगुती गणपतीसाठी २ फुटाच्या मर्यादित असावी.
  • सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सर्व संबंधित सार्वजनिक गणेश मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासनाची त्यांचे स्थानिक धोरणानुसार पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.
  • पारंपरिक गणेशमूर्ती ऐवजी घरातील धातू संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्याघरी करावे. घरी विसर्जन करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे. गणेश मूर्तीचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास त्या मूर्तीचे विसर्जन माघीगणेशोत्सव विसर्जनाच्यावेळी किंवा २०२१ च्या भाद्रपद महिन्यात म्हणजेच पुढील वर्षाच्या विसर्जनाच्यावेळी करता येणं शक्‍य आहे.
  • मा. न्यायालयानं निर्गमित केलेले आदेश आणि महापालिका तसंच संबंधित स्थानिक प्रशासन यांचं मंडपा बाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारावे आणि गणपतीची साधी सजावट करण्यात यावी.
  • सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/ शिबिरे उदा. रक्तदान शिबिर आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना,मलेरिया, डेंगू असे आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय त्याचप्रमाणे स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.
  • उत्सवाकरिता देणगी/ वर्गणी स्वेच्छेनं दिल्यास त्याचा स्वीकार करावा. आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.
  • आरती, भजन, कीर्तन आणि अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी करू नये.
  • गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरण करावं. तसंच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी.
  • श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन केबल नेटवर्क वेबसाईट आणि फेसबुक इत्यादींद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.
  • श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे.


हेही वाचा

बाप्पाच्या विसर्जनासाठी दक्षिण मुंबईत ५ कृत्रिम तलाव

Ganesh Festival 2020 गणेशोत्सवासाठी दहिसर बोरीवलीत मूर्ती दान योजना

पुढील बातमी
इतर बातम्या