नरकचतुर्दशी ही दिवाळीची पहिली अंघोळ. या दिवशी पहाटे लवकर उठून सुगंधी तेल आणि उटणे लावून अभ्यंगस्नान केल्यानंतर फराळाची पंगत ही घरोघरी असते. मुलांची खरी दिवाळी याच दिवसापासून सुरू होते. कारण या लहानग्यांना खाण्यासोबतच फटाके फोडण्याचा आनंद याच दिवसापासून लुटता येतो. या दिवशी नवीन कपडे, फराळ, फटाके वाजवणे या सर्व गोष्टी लहानांना विशेष आवडतात. पण या दिवसाचं महत्त्व काय? सकाळी लवकर उठून अंगाला उटणं आणि सुगंधी तेल लावून का अंघोळ करतात? याबद्दल तुम्हाला माहीत आहे का?
अश्विन महिना संपल्यानंतर कार्तिक म्हणजेच थंडीचे दिवस सुरू होतात. या कालावधीत अंगाला तेल लावून गरम पाण्याने अंघोळ करणे हे आरोग्यदायी असते. आपल्या आरोग्यासाठी उत्तम असलेल्या गोष्टींची आवश्यकता पटवून देण्यासाठीच हे धार्मिक परिमाण दिले आहे.
आश्विन महिन्याच्या चतुर्थीलाच नरकचतुर्दशी म्हणतात. या दिवशी सकाळी एक दिवा आणि संध्याकाळी संपूर्ण घर रोषणाईने उजळून निघाल्यास त्या घरातील व्यक्तींना नरकात जावे लागत नाही, अशी एक आख्यायिका आहे.
अशीही एक अख्यायिका आहे की नरकासूर हा प्राग्ज्योतिषपूर या गावचा राजा होता. त्याला तिन्ही लोक आपल्या अधिपत्याखाली आणायचे होते. त्यासाठी त्याला 20 हजार कुमारीकांचे बळीही द्यायचे होते. यासाठी त्याने सोळा हजार कन्यांना तुरुंगात कैद करून ठेवले होते. पण श्रीकृष्णाने या मुलींना सोडवण्याचे ठरवले. आणि नरकासुराला युद्धाचे आव्हान दिले. यावेळी कृष्णाची पत्नी सत्यभामाने नरकासुराचा वध केला आणि त्या मुलींची सुटका केली. या स्त्रियांची प्रतिष्ठा राखण्यासाठीच कृष्णाने त्या 16 हजार मुलींशी लग्न केले.
आज नरकासूर नसला, तरी रोगराई घालवण्यासाठी घराचा कानाकोपरा स्वच्छ करून या दिवशी दिवे लावले जातात. अंधार दूर करून प्रकाश पसरवणे हाच या दिवसामागचा खरा उद्देश आहे.
हेही वाचा -