न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या दहीहंडी मंडळांवर कारवाई?

दहीहंडी उत्सवात शहरातील रस्त्यांवर मंडप घालून नियमांचं उल्लंघन करणारे आयोजक आणि मानवी थरांमध्ये १४ वर्षांहून कमी वयाच्या मुलांना सहभागी करून घेणाऱ्या मंडळांची आणि आयोजकांची पोलिसांनी यादी बनवली आहे. या यादीनुसार कायदा मोडणाऱ्या मंडळांवर न्यायालयाच्या आदेशानुसार केव्हाही कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

नियम धाब्यावर

दहीहंडीला साहसी खेळ म्हणून मान्यता मिळाल्याने नियमाच्या चौकटीत राहून दहीहंडी उत्सव साजरा करावा, असे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र सोमवारी उत्सव साजरा करताना लहान दहीहंडी मंडळांपासून राजकीय दहीहंड्यांचं आयोजन करणाऱ्या माेठ्या आयोजकांनी देखील हे नियम धाब्यावर बसवल्याचं दिसून आलं.

वयोमर्यादेचं उल्लंघन

काही मंडळांच्या मानवी थरांमध्ये १४ वर्षांखालील अल्पवयीन मुलांचा सहभागही दिसून आला. उत्सवादरम्यान लावलेल्या डिजेच्या कर्णकर्कश आवाजाने ठिकठिकाणी ध्वनीप्रदूषणाची पातळी वाढवली होती.

कारवाई करणार

न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं उल्लघंन करणाऱ्या मंडळांवर कायदेशीर कारवाईचा इशारा पोलिस उपायुक्त मंजुनाथ सिंग यांनी आधीच दिला होता. त्यानुसार पोलिसांनी ही यादी बनवली असून लवकरच असे मंडळ आणि आयोजकांवर कारवाई करण्यात येणार आहे.


हेही वाचा-

जय जवानची ९ थरांची सलामी अन् मुख्यमंत्र्यांची लाइव्ह काॅमेंट्री

थर लावताना धारावीतील एका गोविंदाचा मृत्यू!


पुढील बातमी
इतर बातम्या