Navratra Utsav 2020 : मुंबादेवी! मुंबईची ग्रामदैवत

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

१७ ऑक्टोबर म्हणजेच शनिवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. नवरात्रीत ९ दिवस व्रत ठेवून देवीची मनोभावे पूजा केली जाते. महाराष्ट्रात माहूरची रेणुकामाता, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि वणीची सप्तश्रृंगी देवी अशी देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत.

पण यावर्षी नवरात्रीवर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे कुठे जाण्याचा प्रश्नच नाही. शिवाय धार्मिक स्थळं अद्याप बंद आहेत. त्यामुळे मंदिरात जाऊन दर्शन घेणं शक्यच नाही. पण तुम्ही दर्शनासाठी मंदिरात जाऊ शकत नाही म्हणून काय झालं? आम्ही आहोत ना! एका वेगळ्या दृष्टीकोनातून तुम्हाला मुंबईतल्या ९ देवींचं दर्शन घडवून आणू. फक्त एवढंच नाही तर त्या मंदिराची ख्याती देखील तुमच्यापर्यंत पोहचवू.

प्रत्यक्ष मंदिरात जाऊन दर्शन घेता आलं नाही. पण मनानं तुम्ही दर्शन घेऊ शकता. मुंबईत देखील सांस्कृतीक आणि धार्मिक महत्त्व टिकवून ठेवणारी देवीची अनेक मंदिरे आहेत. अशाच ९ मंदिरांची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. सुरुवात करूया काळबादेवी इथल्या मुंबादेवीच्या मंदिरापासून...

मुंबईची ग्रामदैवत

मुंबईची ग्रामदैवत, अशी मुंबादेवीची ओळख. मुंबादेवीच्या नावावरूनच मुंबईचे नामकरण झाल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे. मुंबादेवी मुंबईतील आद्य रहिवासी कोळी समाजाची आराध्य दैवत. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करून मुंबादेवीचे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येतं. नवरात्रीत पाठ वाचनाबरोबर नवमीला हवन केलं जातं.

देवीची स्थापना

६०० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी टर्मिनलच्या जागी मुंबादेवीचे जुने मंदिर होते. इंग्रजांच्या काळात मुंबई औद्योगिक नगरी म्हणून उदयाला येत होती. दळणवळणासाठी योईस्कर म्हणून छत्रपती टर्मिनल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी इंग्रजांनी स्थानिक कोळी समाजाला विनंती करून काळबादेवी इथल्या भूलेश्वर परिसरात मंदिर बांधले. त्यानंतर १९१५ साली देवीची नव्याने प्रतिष्ठापना करण्यात आली.

‘असं’ आहे मंदिराचं बांधकाम

मुंबादेवी मंदिराचे दगडी बांधकाम जुन्या वैभवसंपन्न मंदिरांची आठवण करून देते. मंदिराच्या गाभाऱ्यातील जुन्या धाटणीचे कोरीव काम लक्ष वेधून घेते. मंदिरातील देवीची मूर्ती वालुकामय स्वरूपाची असून तिला दागिन्यांनी मढवलेली आहे. मंदिरात दोन गाभारे असून एका गाभाऱ्यात मुंबादेवी आणि दुसऱ्या गाभाऱ्यात अन्नपूर्णा तसेच जगदंबा मातेची मूर्ती आहे.


हेही वाचा

नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करा, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

पुढील बातमी
इतर बातम्या