दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप

लाडू्-मोदक आणि पंचपंक्वानांचा पाहुणचार घेऊन दीड दिवसांच्या गणपती बाप्पांनी भक्तांचा शुक्रवारी निरोप घेतला. ''गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'' जयघोषात आणि ढोलताशांच्या गजरात तसंच भक्तीमय वातावरणात भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.

श्री गणरांच्या मूर्ती विसर्जनासाठी समुद्र किनाऱ्यांसह महापालिकेची ६९ विसर्जन स्थळे भक्तांच्या गर्दीने फुलून गेली होती. संध्याकाळी ९ वाजेपर्यंत सार्वजनिक आणि घरगुती अशा अंदाजे ४३, ४४९ हजार गणेशमूर्तींचं विसर्जन भक्तीभावे पार पडलं.

विशेष व्यवस्था

श्री गणरायांचं आगमन गुरुवारी झाल्यानंतर शुक्रवारी दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला. गणेशमूर्तींचं विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी मुंबईतील प्रमुख समुद्र किनाऱ्यांसह तलाव आदी ६९ विसर्जन स्थळांवर विशेष व्यवस्था करण्यात आली होती. तसंच ३१ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्थाही करण्यात आली होती.

कुठे विसर्जन?

गिरगाव चौपाटीसह शिवाजी पार्क, दादर, माहीम, जुहू, मालाड, अक्सा, मनोरी, गोराई आदी ठिकाणांसह शाम नगर, शितल तलाव, सायन तलाव, शांताराम तलाव, आरे कॉलनी आदी ठिकाणीही दीड दिवसांच्या गणपतींचं मोठ्या प्रमाणात विसर्जन करण्यात आलं.

या सर्व विसर्जनस्थळांवर संध्याकाळी ९ वाजेपर्यंत १२८ सार्वजनिक, सुमारे ४३, ३१९ घरगुती अशा एकूण ४३ ४४९ गणेशमूर्तींचं विसर्जन झालं. तर ३१ कृत्रिम तलावांमध्ये सार्वजनिक २४ आणि घरगुती ९, ८८३ गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यात आल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.


हेही वाचा-

का असतो बाप्पा दीड दिवसांचा? जाणून घ्या पुराणातील कथा

अभिनेता स्वप्निल जोशीच्या 'पंचधातू गणेशा'चं विसर्जन


पुढील बातमी
इतर बातम्या