सोशल मीडियामुळे सणांमधून भेटकार्ड हद्दपार!

  • संचिता ठोसर & मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

पूर्वी दिवाळी सण आला की घरात लहान मुलांची लगबग असायची. आकाश कंदील तयार करणे, किल्ला बांधणे, दिवाळीच्या शुभेच्छा देणारे भेटकार्ड तयार करणे यात मुलं मग्न असायची. मात्र, काळ बदलला आणि ही दिवाळीची मजा मुलं विसरून गेली. व्हॅट्सअॅप, फेसबुक या सोशल मीडियाच्या जगात भेटकार्ड कुठल्या कुठे हरवून गेले आहेत.

पूर्वी कार्ड पेपर आणणे, त्यावर पणती, आकाश कंदीलने सजावट करणे, दिवाळीच्या शुभेच्छा देणारे संदेश लिहून भेटकार्ड तयार केली जात असत. दिवाळीच्या शुभेच्छा देताना ही भेटकार्ड दिली जात होती. नंतर हळूहळू काळ बदलला आणि हीच भेटकार्ड गिफ्ट्सच्या दुकानात विकत मिळू लागली. दिवाळी, वाढदिवस, फ्रेंडशीप डे, मदर्स डे, फादर्स डे अशा अनेक 'डे'च्या निमित्ताने या भेटकार्डांची देवाणघेवाण होऊ लागली.

मी लहान असताना शाळेत भेटकार्ड तयार करायला सांगायचे. शाळा संपली, त्यानंतर कधी मी कधी भेटकार्ड तयार केल्याचं मला आठवतच नाही. मला प्रत्यक्षात भेटून शुभेच्छा द्यायला आवडतात. मात्र ऑफिसला दिवाळीची आधीइतकी सुट्टी मिळत नसल्यामुळे आता मी सोशल मीडियावरून शुभेच्छा देते. व्हॉटसअॅपवरून शुभेच्छा देणं मला जास्त सोयीस्कर वाटतं. 

मधुरा नाईक

आता २१ व्या शतकात सोशल मीडियाचा वापर वाढला आणि भेटकार्ड काळाच्या पडद्याआड गेल्याचं चित्र निर्माण झालं आहे. गेले चार-पाच वर्ष व्हॉट्सअॅप, फेसबुक मेसेजद्वारे शुभेच्छा दिल्या जात आहेत. हळूहळू लोकांना दिवाळीच्या शुभेच्छांसाठी भेटकार्डाचा विसर पडला. व्हॉट्सअॅप, फेसबुकद्वारे काही मिनिटांच्या आत हजारो लोकांना शुभेच्छा देणे सोपे असल्यामुळे हल्ली सर्रास याचा वापर केला जात आहे.

दिवाळी आली की आईला फराळात मदत करणं आणि दिवाळीच्या शुभेच्छा देणारी भेटकार्ड तयार करणं हे आमचं आवडतं काम होतं. काळ बदलला आणि हळूहळू भेटकार्ड तयार करणं बंद झालं. आज माझं वय ७५ वर्ष आहे. आता लहान मुलांना मोबाईलवरून शुभेच्छा देताना ऐकलं की मला माझ्या लहानपणीची आठवण येते. आम्ही न चुकता गावी सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देणारे भेटकार्ड पाठवायचो. आज ही भेटकार्ड तयार करावसं वाटतं. पण शरीर साथ देत नाही. 

नलिनी जोशी


हेही वाचा

गिफ्ट, सुक्या मेव्याकडे ग्राहकांनी फिरवली पाठ

पुढील बातमी
इतर बातम्या