बाप्पाच्या स्वागतासाठी त्यानं घरातच उभारलं 'शिवस्मारक'

  • सचिन गाड & मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

बुद्धीचा अधिष्ठाता अशी गणरायाची ओळख असल्याने गणेशोत्सवात भाविकांच्या कल्पकतेला जणू चालनाच मिळते. ही कल्पकता मूर्तीपासून ते सजावटीपर्यंत सर्वत्र दिसून येते. याच कल्पकतेतून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना लाखो रुपये खर्च करूनही साकारता येणार नाही, असे देखणे 'शिवस्मारक' सांताक्रूझमधील एका अवलिया कलाकाराने आपल्या घरात उभारले आहे. ही कलाकृती पाहून खऱ्याखुऱ्या 'शिवस्मारका'च्या प्रतिक्षेत असलेल्या प्रत्येकाला नक्कीच आनंद होईल.

हे 'शिवस्मारक' साकारणाऱ्या कलाकाराचे नाव दीपक मकवाना असे असून ते पेशाने इंटिरिअर डिझायनर आहेत. मकवाना यांनी मुंबई लगतच्या अरबी समुद्रात उभ्या राहणाऱ्या महाराजांच्या भव्य वास्तूचा देखावा घरात साकारताना सभोवतालचा परिसर, स्मारकाशेजारील हेलिपॅड, मरीन ड्राईव्हला जोडणारा पूल, पाण्यातल्या बोटी असा सारा नजारा तपशीलासकट उभारला आहे.

याआधी 'सी लिंक'ची प्रतिकृती

दरवर्षी वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या मकवाना यांनी आधीदेखील आकर्षक देखावे घरात साकारले आहेत. त्यात वांद्रे-वरळी सी लिंक, मुंबई मेट्रो, पद्मास्वामी मंदिर, केदारनाथ मंदिर, चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंचावरील रेल्वे पूल, मुंबई टि २ आंतरराष्ट्रीय विमानतळ, चंद्रोदय मंदिर अशा कलाकृतींचा समावेश आहे.

कशी सुचली कल्पना

मी स्वतः इंटिरिअर डिझायनर असून मागील २६ वर्षांपासून मी घरात गणेशोत्सवादरम्यान विविध कलाकृती साकारत आहे. एखादी कलाकृती साकारायला किमान महिनाभर लागतो. अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या स्मारकाच्या डिझाइनचा अभ्यास करूनच मी हे स्मारक उभारले आहे, या प्रतिकृतीतून शिवस्मारक जगातील सर्वात उंच स्मारक असल्याचेही मी दाखवून दिले आहे.

- दीपक मकवाना, इंटिरिअर डिझायनर

असे उभे राहिले महाराजांचे स्मारक

सुरूवातीला मी लाकडाची एक मोठी फ्रेम बनवली. प्लास्टिकच्या साहाय्याने तिला वॉटरप्रूफ बनवले. या फ्रेमला आतून निळ्या रंगाने रंगवून समुद्राचा इफेक्ट् दिला. त्यानंतर समुद्रात कारंजे उभारले.

स्मारकात महाराजांचा जसा पुतळा बनविण्यात येणार आहे, तशी प्रतिकृती मला फारच कष्टाने मिळाली. प्लास्टिक आणि प्लायवूडच्या वापरातून किल्ला उभारला. त्याला लागून पूल उभा केला, ठिकठिकाणी एलईडी लाईट बसवली आणि त्यानंतर स्मारकाला वळसा घालणारी बोट पाण्यात सोडली, असे मकवाना म्हणाले.


हे देखील वाचा -

ही मंडळं ठरणार गणेशोत्सवात प्रमुख आकर्षण!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या