दहीहंडीच्या आयोजकांना काढावा लागणार आता 'स्पॉट विमा'

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

दहीहंडी उत्सव आता केवळ २ आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळं मुंबईत राज्यभरातील सर्व गोविंदा पथक थरांच्या सरावता व्यस्त आहेत. गोविंदा पथकातील प्रत्येकाला आता हंडी फोडून बक्षिस लुटण्याची आतुरता लागली आहे. परंतु, या सगळ्यात महत्वाची असते ती म्हणजे 'सुरक्षा'. त्यामुळं यंदा दहीहंडी पथकांसह आयोजकांनीही ‘स्पॉट विमा’ काढावा, असा महत्त्वपूर्ण निर्णय दहीहंडी समन्वय समितीनं शनिवारी झालेल्या बैठकीत घेतला आहे.

७५ रुपयांत विमा

अवघ्या ७५ रुपयांत १० लाखांचं विमा कवच गोविंदासाठी उपलब्ध आहे. त्यामुळं राज्यातील सर्व गोविंदा पथकांनी त्वरीत विमा काढावा. त्याचप्रमाणं, आयोजकांनीही जागेचा विमा काढावा. जेणेकरून अपघात घडल्यास गोविंदांना उपचार खर्च मिळण्यास मदत होईल, असे दहीहंडी समन्वय समितीनं म्हटलं आहे.

विविध मुद्द्यांवर चर्चा

परळच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या सभागृहात शनिवारी ही बैठक पार पडली. आगामी दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्सवाशी निगडीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. गोविंदांची सुरक्षा, बाल गोविंदाचा उत्सवातील सहभाग, सेलिब्रेटींवर पैसे उधळणे, विमासक्ती, सराव-उत्सवादरम्यान सुरक्षेची काळजी, गोविंदांचे होणारे मृत्यू अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

आर्थिक परिस्थिती गंभीर

दरवर्षी थर रचताना अनेक जण गंभीर जखमी होतात. तसंच, अनेकांची आर्थिक परिस्थिती गंभीर असल्यानं योग्य उपचार करता येत नाही. त्यामुळं गोविदा पथकाताली प्रत्येकाच्या सुरक्षेसाठी विमा योजना काढण्यात आली. ज्यामुळं त्यांना उपचार घेताना कोणतेही अडथळे येणार नाही.


हेही वाचा -

मुंबईतल्या हाॅटेलचा प्रताप, २ अंडी, आॅम्लेटचं बिल ३४०० रुपये!

‘या’ बँकांनी कर्जे केली स्वस्त! जाणून घ्या कुणाचे किती दर?


पुढील बातमी
इतर बातम्या