आपली खिचडी बनणार भारताचा राष्ट्रीय खाद्यपदार्थ!

बहुतांश भारतीयांच्या रोजच्या जेवणात हमखास आढळणारा पदार्थ म्हणजे खिचडी! महाराष्ट्रातर तर प्रत्येक घरात तुम्हाला खिचडीप्रेमी आढळतील. आणि मुंबईत म्हणाल, तर कामाच्या वेळा पाळता पाळता मुंबईकर कधी खिचडी नावाचं पथ्य पाळायला लागले हे त्यांचं त्यांनाही कळलं नाही. पण आता तुमच्या-आमच्या रोजच्या जेवणातल्या या खिचडीला एक वेगळीच ओळख मिळणार आहे.

कुठे होणार घोषणा?

येत्या 4 नोव्हेंबरला राजधानी दिल्लीमध्ये आत्तापर्यंतचा सर्वात मोठा खाद्य महोत्सव भरतोय. वर्ल्ड फूड इंडिया असं या महोत्सवाचं नाव असून या महोत्सवामध्ये खिचडीबद्दलची ही महत्त्वपूर्ण घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. आणि ती घोषणा म्हणजे आता खिचडीला भारताचा राष्ट्रीय खाद्य पदार्थ म्हणून मान्यता मिळणार आहे!

खिचडीच का?

नमभारत टाईम्स या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, अन्न मंत्रालयाने खिचडीला राष्ट्रीय खाद्य पदार्थ म्हणून मान्यता देण्यासंदर्भात प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यासंदर्भात अन्न मंत्री हरसिमरत कौर यांनी सांगितलं की, 'खिचडी भारतात सर्वच जण खातात आणि ती आरोग्यासाठी लाभदायी असून आर्थिकदृष्ट्याही प्रत्येकाला परवडणारी आहे.'

800 किलोची खिचडी!

वर्ल्ड फूड इंडिया महोत्सवामध्ये या संदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यावेळी तब्बल 1 हजार लीटर क्षमता असलेल्या कढईमध्ये 800 किलो खिचडी बनवून ती उपस्थित पाहुण्यांना सर्व्ह केली जाणार आहे. यासाठी खास तेवढ्या मोठ्या आकाराची कढई बसवण्यात आली आहे. आणि ही खिचडी सुप्रसिद्ध शेफ संजय कपूर आणि त्यांची 50 जणांची टीम बनवणार आहेत. या उपक्रमाची नोंद ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही केली जाणार आहे.


हेही वाचा

मुंबईतली खाऊगिरी...

पुढील बातमी
इतर बातम्या