आरोग्य विभागात भरणार तातडीनं १६ हजार पदं

राज्याच्या आरोग्य विभागात १६ हजार पदांची भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या भरतीमध्ये क आणि ड वर्गातील १२ हजार पदं, ब वर्गातील २ हजार पदं आणि २ हजार विशेषज्ञांचा समावेश असणार आहे. भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी तातडीनं आदेश जारी करण्यात येतील, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

राजेश टोपे म्हणाले की, येत्या आठवड्याभरात याबाबतची शासन पातळीवरची निर्णय प्रक्रिया पार पाडली जाईल आणि त्यानुसार भरती प्रक्रियेला सुरुवात केली जाईल.  राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता भासत आहेत. तसंच तिसऱ्या लाटेला वेळीच रोखण्यासाठी तयारी करणं आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून रिकाम्या जागा भरण्याची मागणी करण्यात आली होती. त्या मागणीला मान्यता मिळाल्याची माहिती टोपे यांनी दिली.

दरम्यान, यासंदर्भात पुढील निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार आरोग्य विभाग, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना देण्याचा ठराव मंत्रिमंडळ बैठकीत झाल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही सांगितलं की रुग्णसेवेशी संबंधित पदांची १०० टक्के भरती करण्याची आवश्यकता आहे. कॅबिनेटने ठरवलं आहे की आता आरोग्य विभाग, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या स्तरावर हा निर्णय येत्या २ ते ३ दिवसांत घेतला जाईल. तसंच. तातडीने परीक्षा घ्याव्यात असं देखील ठरवण्यात आलं असल्याचंही टोपे यांनी सांगितलं. 

या भरतीतील क आणि ड वर्गासाठी एजन्सीच्या माध्यमातून परीक्षा घेतली जाईल. आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांच्या माध्यमातून ब वर्गाच्या मुलाखती घेतल्या जातील. तर अ वर्गासाठीचे सिलेक्शन एमपीएससीकडे पाठवले जातील,  असं टोपे यावेळी म्हणाले.


हेही वाचा

मास्कविना फिरणाऱ्यांकडून ५४ कोटींचा दंड वसूल

मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ

पुढील बातमी
इतर बातम्या