मुंबईत 198 रुग्ण व्हेंटिलेटरवर तर 583 आयसीयूमध्ये

मुंबईत कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे रुग्णांवर वेळीच उपचार करण्यात अडचणी येत आहेत. रोज रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आतापर्यंत मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 30 हजारांच्या वर गेली आहे. यामधील 198 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर 583 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांवर विविध रुग्णालयातील आयसीयूत उपचार सुरु आहेत.

मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा 30, 359 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 988 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  कोरोना बाधित व कोरोनामुळे मृत्यू झालेले या दोघांच्या संख्येत पुढील काही दिवस वाढच होणार आहे.  त्यामुळे पालिकेच्या आरोग्य यंत्रणेसह राज्य सरकारची झोप उडाली आहे. 198 रुग्ण व्हेंटिलेटरवर तर 583 रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

दरम्यान,  आतापर्यंत 8,074 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याने आरोग्य विभागावरील ताण थोडाफार कमी झाला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य विभाग युध्दपातळीवर काम करत आहे. परंतु लोकांनी सहकार्य करत पुढील काही दिवस घरातच रहाणे पसंत केले तर लवकरच कोरोनाला हरवणे शक्य होईल. त्यामुळे लोकांनी घरातच रहा सुरक्षित रहा असे, आवाहन मुंबईकरांना आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोना रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीसह त्याच्या वाढत्या सरासरीवरही लक्ष ठेवले जात आहे. ज्या विभागात रुग्ण वाढीचा दर 8 टक्क्यांपेक्षा जास्त अथवा कमी असेल त्याप्रमाणे त्या विभागाचे वर्गीकरण केले जाते. 16 ते 22 मे या दिवसांत कोरोना रुग्ण वाढीचा दर 6.61 टक्के राहिला आहे.


हेही वाचा -

विमान सेवेतून 'इतक्या' प्रवाशांचं मुंबईत आगमन

कोरोनामुळे वडाळ्यातील जीएसबी मंडळाचा यंदाचा गणेशोत्सव रद्द!


पुढील बातमी
इतर बातम्या