मुंबई डॉकयार्डवर 21 नौसैनिकांना कोरोनाची लागण

भारतीय नौदलाच्या आयएनएस आंग्रे या मुंबईतील तळावरील 21 नौसेनिकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. मुंबईतीलच नौदलाच्या आयएनएचएस अश्विनी या रुग्णालयात या नौसैनिकांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं आहे. 

 7 एप्रिल रोजी आयएनएस आंग्रे येथील एक नौसैनिकाला कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं.  त्याच्याच संपर्कातून अन्य नौसैनिकांनाही कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. भारतीय नौदलातील नौसैनिकांना कोरोनाची लागण झाल्याची ही पहिलीच घटना आहे. नौदलातील या नौसैनिकांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सध्या घेण्यात येत आहे. नौदल तळाच्या परिसरातच आवश्यक कामांसाठी हे नौसैनिक फिरले असावेत असा नौदलाचा अंदाज आहे. देशात लॉकडाऊन सुरू असल्यामुळे नौदलाच्या तळांवरील असलेल्या निवासी वसाहतीत नौसैनिक जात नाहीत. 

 मुंबईच्या किनाऱ्यावर भारतीय नौदलाचं आयएनएस आंग्रे हे तळ आहे. येथे नौसैनिकांची निवास्थानं आहेत. याच तळावरून पश्चिम नौदल कमांडच्या वेगवेगळया ऑपरेशन्ससाठी मदत करण्यात येते. नौदलाच्या युद्धनौका किंवा पाणबुडीवर मात्र एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.


हेही वाचा -

येत्या २० एप्रिलपासून टोल वसूली सुरु होणार

मुलांसोबत 'ती' ८५ किलोमीटर अनवाणी चालली, २५ दिवसात गाठली मुंबई


पुढील बातमी
इतर बातम्या