मुंबईपाठोपाठ आता नवी मुंबईतही बोगस लसीकरण झाल्याचं समोर आलं आहे. या बोगस लसीकरणाचा मास्टरमाईंडचं नाव डॉ. मनीष त्रिपाठी असं आहे. त्याच्यासह आणखी दोन जणांवर तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. डॉ. त्रिपाठी याने याआधी मुंबईतील कांदिवली येथे बोगस लसीकरण केलं असल्याचे निष्पन्न झालं आहे.
नवी मुंबईतील शिरवणे एमआयडीसीतील एटोमबर्ग टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीतील ३५२ कर्मचाऱ्यांचे बोगस लसीकरण करण्यात आल्याचं उघडकीस आले आहे. बनावट लसीकरण करून आरोपींनी कंपनीकडून ४ लाख २४ हजार ५३६ रुपये उकळले आहेत.
नेरुळ येथे राहणाऱ्या फिर्यादी कल्पेश पद्माकर पाटील यांनी तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पाटील काम करत असलेल्या अटोम्बर्ग टेक्नॉलॉजी कंपनीतर्फे कामगारांसाठी लसीकरणाचं आयोजन करण्यात आलं होतं. या लसीकरणाची जबाबदारी केईसीपी हेल्थ केयर हॉस्पिटलवर सोपवण्यात आली होती. त्यानुसार डॉ. मनीष त्रिपाठी यांनी त्यांचे पथक त्याठिकाणी पाठवले होते.
२३ एप्रिलला हे शिबीर भरवलं होतं. यावेळी कंपनीतल्या ३५२ कामगारांचे लसीकरण करून ४ लाख २४ हजार रुपये घेण्यात आले. याशिवाय लसीकरण केल्याचे त्यांना बनावट प्रमाणपत्र देखील देण्यात आले. मात्र काही कामगार दुसरा डोस घेण्यासाठी गेले असता, त्यांना पहिल्या डोस घेतल्याचे देण्यात आलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आले.
मुंबईतील बोगस लस प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने कडक शब्दात ताशेरे ओढले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांकडून या प्रकरणी दहा जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच दोन दिवसांपूर्वीच याप्रकरणी डॉ. मनीष त्रिपाठीने आत्मसमर्पण केले होते.
हेही वाचा-