ठाणे जिल्ह्यात २५ दिवसांत ४० हजार नवीन कोरोना रुग्ण

ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या रोज मोठ्या प्रमाणावर वाढतच आहे. मागील २५ दिवसांत जिल्ह्यात तब्बल ४० हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामधील सर्वाधिक रुग्ण कल्याण-डोंबिवली आणि ठाणे शहरातील आहेत. कल्याण-डोंबिवलीतील १० हजार तर ठाणे शहरातील ८ हजार रुग्णांचा समावेश असून संपूर्ण जिल्ह््यातील एकूण रुग्णसंख्येच्या निम्मे रुग्ण या दोन्ही शहरांतील असल्याचे दिसून आले आहे.

कल्याण-डोंबिवलीत रोज ४०० ते ५०० रुग्ण आढळत आहेत. २५ दिवसात कल्याण-डोंबिवलीत १० हजारांपेक्षा अधिक तर ठाणे शहरात ८ हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. ठाणे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या १ लाख ६४ हजार झाली आहे. यापैकी १ लाख ४१ हजार बरे झाले आहेत. सध्या जिल्ह्यात १८३४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ४ हजार २३४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

एका महिन्यापूर्वी जिल्ह्यात रोज १००० ते १२०० रुग्ण आढळून येत होते. मात्र, मागील काही दिवसांपासून रोज एक हजार ७०० हून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. कळवा, नौपाडा, मानपाडा-माजिवडा, वर्तकनगर या परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. या ठिकाणी दररोज ५० हून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. ठाणे शहरात गेल्या २३ दिवसांत ८ हजार ८१ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

 कल्याण पश्चिम आणि डोंबिवली पूर्व या ठिकाणी रोज प्रत्येकी १०० ते १५० रुग्ण आढळून येत आहे. ऑगस्ट महिन्यात येथील रुग्णसंख्या आटोक्यात आली होती. मात्र, सप्टेंबर महिन्यापासून रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागली आहे.


हेही वाचा -

येत्या १ ऑक्टोबरपासून टोलदरात होणार 'इतकी' वाढ

कोरोना रुग्णांसाठी सिटी स्कॅनचे दर २००० रुपये


पुढील बातमी
इतर बातम्या