महापालिका घरोघरी जाऊन घेणार टीबीच्या रुग्णांचा शोध

मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा घरोघरी जाऊन टीबीचे नवीन रुग्ण शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. ११ ते २७ जानेवारी दरम्यान ही मोहीम मुंबईच्या २४ वॉर्डमध्ये राबवण्यात येणार आहे.

या मोहिमेअंतर्गत काही डॉक्टर्स, परिचारीका घरोघरी जाऊन नवीन टीबीच्या रुग्णांचा शोध घेणार आहेत. प्रत्येक वॉर्डमधील जवळपास ३० हजार रहिवाशांची मोहिमेदरम्यान तपासणी करण्यात येईल, असं मुंबई महापालिकेच्या टीबी कंट्रोल युनिटच्या प्रमुख डॉ. दक्षा शहा यांनी सांगितलं.

शिवाय, प्रत्येक झोपडपट्टीत आरोग्य अधिकारी जाणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. या मोहिमेत ३० सदस्यांची एक टीम अशा २६० टीम्स कार्यरत असणार आहेत. या मोहिमेत ७ लाख लोकांपर्यंत पोहोचणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

या मोहिमेदरम्यान ज्या कोणाची लक्षणं टीबीसारखी असतील. त्यांना आम्ही तत्काळ एक्स-रे काढण्यास जवळच्या रुग्णालयात पाठवणार आहोत. शिवाय, त्यांच्या थुंकीची देखील तपासणी केली जाईल. त्यानुसार जर त्या व्यक्तीचा एमडीआर लेव्हलचा टीबी असेल तर त्यावर तातडीने उपचार करणं सोपं जाणार आहे. वर्षभरात दोन वेळा ही मोहीम राबवली जाते. त्यानुसार ही आमची दुसरी मोहीम आहे.

- डॉ. दक्षा शहा, प्रमुख, टीबी कंट्रोल युनिट, मुंबई महापालिका


हेही वाचा-

पालिकेच्या टीबी विभागात येणार जीन एक्सपर्ट मशिन


पुढील बातमी
इतर बातम्या