coronavirus : पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात १५० जण, १४ दिवसाच्या क्वारंटाईनमध्ये

वरळी कोळीवाड्यातील तीन रहिवाशांची कोरोनाव्हायरसची पॉझिटिव्ह आली. त्यानंतर पालिकेनं त्यांच्या संपर्कात आलेल्या १५० लोकांना शोधून काढले आहे. या सर्व १५० जणांना पोद्दार रुग्णालयात क्वारंटाईन म्हणजेच वेगळं ठेवण्यात आलं आहे. वरळी कोळीवाड्यातील ३ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एक कपल जोडपे आहे. त्यामुळे त्यांना जास्त धोका असल्याचं बोललं जातंय.

अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, काही रहिवासी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यासाठी पाठवत नाहीत. परंतु, त्यांची मनधरणी करण्यात येत आहे. त्यांना पटवून देण्यात येत आहे. सर्वांना बेस्ट बसेसमधून रुग्णालयात नेण्यात आल्याचं देखील अधिकाऱ्यांनी सांगितलं.

जी-दक्षिण प्रभाग (वरळी-महालक्ष्मी)चे सहाय्यक नगरपालिका आयुक्त शरद उघाडे म्हणाले की, “वरळी कोळीवाड्यातून संक्रमित झालेल्यांचा जवळजवळ १५० लोकांशी संपर्क झाला. या सर्वांना आम्ही दुसऱ्या जागी हलवले आहे. बुधवारी, आम्ही पोद्दार रूग्णालयात ८७ जणांना वेगळं ठेवण्याची सोय केली आहे. उर्वरित लोकांना गुरुवारी हलवण्यात आलं. आम्ही त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे.”

महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, “ते दाट लोकवस्ती असलेल्या भागात राहत होते आणि बहुतेक सार्वजनिक स्वच्छता सुविधांचा वापर करतात. विषाणूचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी आम्ही त्यांना वेगळं ठेवण्याचा निर्णय घेतला. या सर्वांना पोद्दार रूग्णालयात १४ दिवसांसाठी वेगळं ठेवण्यात आलं आहे.”

“हे आवश्यक होते. कारण त्यांच्या आरोग्यावर दररोज लक्ष ठेवणं व्यावहारीकदृष्ट्या अशक्य आहे. आता त्यांना क्वारंटाईन केल्यामुळे लक्षणं आढळल्यास त्यांची त्वरित तपासणी केली जाऊ शकते. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना शोधून झाल्यानंतर आणखी काहींना वेगळं ठेवण्यावर भर दिला जाईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

असं म्हटलं जातंय की, नुकतेच एका ३५ वर्षीय व्यक्तीचं निधन झाल्यानंतर परिसर चिंतेचं वातावरण पसरलं आहे. तथापि, स्थानिक अधिकाऱ्यांनी हे स्पष्ट केलं आहे की, हा कोविड १९ मुळे झालेला मृत्यू नाही. तरी मृत व्यक्तीचा मृतदेह तपासणीसाठी केईएम रुग्णालयात नेण्यात आला आहे.


हेही वाचा

Coronavirus Update: कोरोनाचं निदान फक्त ५ मिनिटांत, रॅपिड टेस्टला परवानगी मिळाली

‘इथं’ होणार फक्त कोरोनाग्रस्तांवर उपचार, ३० शासकीय रुग्णालयांना कोरोना विशेष रुग्णालयाचा दर्जा

पुढील बातमी
इतर बातम्या