मुंबईतील नायर रुग्णालयात जिनोम लॅब, एकाच वेळी ४०० चाचण्या आणि २ दिवसात रिपोर्ट

महापालिकेच्या पुढाकारानं सीएसआर फंडाच्या माध्यमातून मुंबईतील नायर रुग्णालयात जिनोम सिक्वेन्सिंग लॅब उभारण्यात आली आहे. या लॅबमध्ये जनुकीय संशोधनावर काम होणार आहे. एका वेळी ४०० नमुन्यांची तपासणी करणं शक्य होणार आहे. चाचणीचा अहवाल अवघ्या चार तासांत मिळणार आहे.

मुंबईतील या पहिल्या जिनोम सिक्वेन्सिंग लॅबचं ऑनलाइन उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. 'नायर रुग्णालयाचा जन्मच साथरोगाच्या काळात झाला. हे रुग्णालय १०० वर्षे पूर्ण करत आहे.

गेल्या शंभर वर्षांपासून हे रुग्णालय आणि येथील डॉक्टर, आरोग्य सेवक रुग्णांना जगवण्याचं काम करत आहेत. आता सुरू करण्यात आलेली ही लॅब नायरच्या शताब्दी वर्षातली सर्वात मोठी आठवण असेल,' असं मुख्यमंत्री म्हणाले.

'करोनाची वाढ जिथं जिथं होते, तिथल्या विषाणूला शोधून काढणं, त्याचा जनुकीय परिणाम शोधणं गरजेचं असतं. जेवढा विषाणूचा प्रकार ओळखण्यास उशीर, तितका त्याचा परिणाम समजून घेणंही कठीण असतं. करोना विषाणूवरून आपणास हे दिसून आलं आहे. त्यामुळंच नायरमध्ये सुरू झालेली जिनोम सिकवेन्सिंग लॅब ही मोठी कामगिरी आहे. महापालिकेनं इच्छाशक्ती दाखवून हे काम पूर्ण करून दाखवलं. सरकार किंवा महापालिकेच्या तिजोरीवर आर्थिक भार न टाकता सीएसआर फंडातून हे काम केलं,' याबद्दल मुख्यमंत्र्यांनी महापालिकेचं कौतुक केलं.

सध्या करोनासारख्या छुप्या शत्रूशी आपलं युद्ध सुरू आहे. इतर साथीच्या रोगांच्या विषाणूचा प्रकार लवकर शोधून वेळेत उपचार करणं गरजेचं आहे. नायरमध्ये सुरू करण्यात आलेल्या लॅबमुळे हे आता शक्य होईल,' असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.


हेही वाचा

नवी मुंबई पालिकेच्या आरटी-पीसीआर लॅबने वर्षात केल्या ४.५ लाख चाचण्या

सांडपाण्याची होणार आरटी-पीसीआर चाचणी, नमुन्यातून संसर्ग तपासणार

पुढील बातमी
इतर बातम्या