Advertisement

नवी मुंबई पालिकेच्या आरटी-पीसीआर लॅबने वर्षात केल्या ४.५ लाख चाचण्या

महापालिकेची स्वत:चीच सुसज्ज आरटी-पीसीआर लॅब कार्यान्वित झाल्याने रिपोर्ट मिळण्याचा कालावधी 24 तासांवर आला.

नवी मुंबई पालिकेच्या आरटी-पीसीआर लॅबने वर्षात केल्या ४.५ लाख चाचण्या
SHARES

कोरोनाविरोधातील लढाईमध्ये 'मिशन ब्रेक द चेन' ची प्रभावी अंमलबजावणी करीत कोरोनाचा प्रसार रोखण्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या नेरूळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालयातील अद्ययावत आरटी-पीसीआर लॅबचा महत्वाचा वाटा आहे.

केवळ 11 दिवसांच्या विक्रमी कालावधीत 4 ऑगस्ट 2020 रोजी  कार्यान्वित करण्यात आलेल्या या आरटी-पीसीआर लॅबची यशस्वी वर्षपूर्ती होत आहे. या लॅबमध्ये मागील वर्षभरात 4 लाख 56 हजाराहून अधिक आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आलेल्या आहेत. महत्वाचे म्हणजे या वर्षभरात दसरा, दिवाळी अथवा इतर सण किवा शनिवार, रविवार वा सार्वजनिक सुट्टी अशी एकही दिवस न थांबता या लॅबने कोव्हीड टेस्टींगचे 365 दिवस अथक आणि अविश्रांत काम केलेले आहे.  

अभिजीत बांगर यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार 14 जुलै 2020 रोजी  स्विकारल्यानंतर 'मिशन ब्रेक द चेन' हाती घेत कोव्हीड रुग्णाचा लवकरात लवकर शोध घेण्याकरिता चाचण्यांच्या संख्या वाढीवर भर देण्याचे लक्ष्य नजरेसमोर ठेवले. त्यादृष्टीने अवघ्या दोनच दिवसात 16 जुलैपासून अर्ध्या तासात पाहणी अहवाल प्राप्त होणा-या रॅपीड अँटिजेन टेस्टींगला मोठ्या प्रमाणात सुरूवात करण्यात आली, त्यासाठी केंद्रांची संख्या वाढ करण्यात आली तसेच मोबाईल टेस्टींगवर भर देण्यात आला. रॅपीड अँटीजेन टेस्ट सुरू करण्यासोबतच नवी मुंबई महानगरपालिकेची स्वत:ची आरटी-पीसीआर टेस्टींग लॅब सुरु करण्याकडेही विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले.  

 नेरुळ येथील पालिकेच्या माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात आरटी-पीसीआर लॅबसाठी दुसऱ्या मजल्यावर 1800 चौफूट प्रशस्त जागेची निवड करणे, तेथे लॅबसाठी पूरक स्थापत्य - विदयुत व इतर पायाभूत सुविधा उभ्या करणे, लॅबकरिता आवश्यक यंत्रसामुग्री व उपकरणे बसविणे, ती कार्यान्वित करण्यासाठी प्रशिक्षित डॉक्टर्स व कर्मचारी नियुक्त करणे तसेच लॅब सुरु करण्याठी गरजेच्या असलेल्या शासकीय परवानग्या मिळविणे अशा सर्वच गोष्टींच्या पूर्ततेसाठी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली एकाच वेळी युध्दपातळीवर काम सुरु करण्यात आले.

 महापालिकेची स्वत:चीच सुसज्ज आरटी-पीसीआर लॅब कार्यान्वित झाल्याने रिपोर्ट मिळण्याचा कालावधी 24 तासांवर आला. ज्याचा कोव्हीडच्या पहिल्या आणि दुस-या लाटेत जलद निदान होऊन त्वरित उपचार करण्यासाठी तसेच उशीरा निदानामुळे कोव्हीडचा होणारा प्रसार रोखण्यासाठी अतिशय उपयोग झाला. शेजारील ठाणे, पनवेल महानगरपालिकेच्या कोव्हीड टेस्ट्सचे रिपोर्ट उपलब्ध करून देण्यातही या लॅबने पहिल्या लाटेत सहकार्याची भूमिका बजावली.

कोव्हीड टेस्ट केल्यानंतर नागरिकांच्या मनात रिपोर्ट येईपर्यंत असणारे दडपण लवकर दूर व्हावे तसेच त्यांना कोव्हीड टेस्टचा रिपोर्ट सहजपणे उपलब्ध व्हावा याकरिता https:/www.nmmccovidcare.com या महानगरपालिकेच्या कोव्हीड पोर्टलवर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आता नागरिक एका क्लिकवर आपला कोव्हीड रिपोर्ट पाहू शकतात तसेच त्याची प्रिंटही काढून घेऊ शकतात.

याशिवाय कोव्हीड टेस्ट करताना नागरिकांनी नोंदणी केलेल्या मोबाईलवर एसएमएस संदेशव्दारेही रिपोर्टची लिंक पाठविली जात असून त्या लिंकवर क्लिक केल्यानंतरही कोव्हीडचा रिपोर्ट सहजपणे उपलब्ध होत आहे. विशेषत्वाने प्रवास अथवा इतर कारणांसाठी आरटी-पीसीआर टेस्ट रिपोर्ट जलद आवश्यक असणा-या नागरिकांसाठी ही 24 तासात रिपोर्ट  उपलब्ध करून देणारी लॅबची कार्यप्रणाली अत्यंत उपयोगी ठरलेली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा