बाळासाठी कॉर्ड ब्लड संजीवनीच

विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मागील दशकात केलेल्या क्रांतीमुळे वैद्यकीय क्षेत्रातदेखील कमालीची प्रगती झाली आहे.  गेल्या दशकामध्ये आई आणि बालकाला जोडणारी नलिका ही बाळासाठी गुणकारी असल्याचा शोध लागला. पण अजूनही सर्वसामान्य लोकांना याबद्दल माहित नाही. जुलै महिना हा जागतिक कॉर्ड ब्लड महिना म्हणून साजरा केला जातो. कॉर्ड ब्लड म्हणजे काय याबद्दल सविस्तर जाणून घेऊया कामा रुग्णालयाच्या स्त्रीरोगतज्ञ डॉ. राजश्री कटके यांच्याकडून.

कॉर्ड ब्लड म्हणजे काय ?

गर्भामधील बाळ आणि माता यांना जोडलेली गर्भनाळ असते.  त्या गर्भनाळेतल्या रक्तास कॉर्ड ब्लड असं म्हणतात. पूर्वी प्रसूतीनंतर गर्भनाळ नष्ट केली जायची.  परंतू संशोधनाने गर्भनाळ ही बाळासाठी जणू संजीवनीच असल्याचं सिद्ध झालं आहे. गर्भनालेतील रक्तामध्ये असलेल्या 'स्टेम सेल्स' या महत्वपूर्ण घटकाचा शोध लागला आहे. ह्या 'स्टेम सेल्स' बालकाचे भविष्यात होणाऱ्या कोणत्याही दुर्धर आजारापासून रक्षण करतात. कॉर्ड ब्लडचं आपल्या आयुष्यातील महत्त्व लक्षात घेऊन आता कॉर्ड ब्लड बँकदेखील तयार करण्यात अाल्या अाहेत.

कॉर्ड ब्लडचं महत्त्व

विज्ञानाच्या संशोधनाने या कॉर्ड ब्लडचं महत्त्व जगजाहीर केलं आहे. अस्थिमज्जा म्हणजेच बोन मॅरो प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेमध्ये कॉर्ड ब्लड वापरता येणं शक्य झालं आहे. बोन मॅरोसहीत अनेक रक्ताशी संबंधीत असलेले आजार जसे की थॅलॅसेमिया, कर्करोग अादी अनेक दुर्धर आजारांवर कॉर्ड ब्लड एक संजीवनीसारखे काम करते. दोन दशकांपूर्वी कॉर्ड ब्लडबद्दल लोकांना काहीच माहिती नसल्यामुळे अनेक जण प्राणघातकी आजाराने मरण पावल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे याबद्दल जनजागृती करणं गरजेचं आहे.

स्टेम ब्लड सेल्स

गर्भनालेतील स्टेम सेल्स हे एका संजीवनीसारखे काम करते. शरीरातील आवश्यकतेनुसार हे स्टेम सेल्स रोगप्रतिकारात्मक बनतात. शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्या तर याच स्टेम ब्लड सेल्स पांढऱ्या रक्तपेशी पुन्हा निर्माण करण्यास मदत करतात आणि शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

अनेक दशकं घटक टिकतात

प्रसूतीनंतर बाळ आणि मातेमधील नाळ बांधून कापली जाते. या नलिकेतील रक्त म्हणजे कॉर्ड ब्लड संग्रहित केलं जातं. सामान्य तापमानात हे किमान १ ते २ दिवस राहू शकतं. कॉर्ड ब्लड निर्जंतुक विभागात संग्रहित केले असता अनेक दशके यातील घटक कायम टिकून राहतात. कॉर्ड ब्लडचं महत्व जाणता आता प्रसूतीनंतर लगेचच कॉर्ड ब्लड प्रसूती झालेल्या मातेच्या नावाने रजिस्टर करून ते त्या - त्या रुग्णालयात असलेल्या कॉर्ड ब्लड बँकमध्ये जमा केलं जातं.


हेही वाचा -

ठाणे मनपा आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या घरातच डेंग्यूची लागण

साथीच्या आजारांसाठी सरकारी रुग्णालयात विशेष व्यवस्था


पुढील बातमी
इतर बातम्या