coronavirus update: महाराष्ट्रात २८.८८ लाख लोकसंख्येचं सर्वेक्षण

सध्या राज्यात १ लाख १९ हजार १६१ लोक होम क्वारंटाईनमध्ये (home quarantine) असून ८,८१४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ५१२ कंटेनमेंट झोन क्रियाशील आहेत. शुक्रवारी एकूण ७७०२ सर्वेक्षण पथकांनी  काम करत २८.८८ लाख  लोकसंख्येचं सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister rajesh tope) यांनी दिली.

सर्वाधिक चाचण्या

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना चाचण्या केल्या जात असून आतापर्यंत १ लाखांहून अधिक जणांच्या कोरोना चाचण्या (corona test) करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख २ हजार १८९ नमुन्यांपैकी ९४ हजार ४८५ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर ६८१७ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 

हेही वाचा - Coronavirus Update: महाराष्ट्रात सर्वाधिक १.२ लाख कोरोना चाचण्या

शुक्रवारी राज्यात कोरोनाबाधित (coronavirus) ३९४ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण काेरोनाबाधित रुग्ण (corona positive) संख्या ६८१७ झाली आहे. शुक्रवारी ११७ रुग्णांना घरी सोडण्यात आलं असून आतापर्यंत राज्यभरात ९५७ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ५५५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

मुंबईतील ११ जण

शुक्रवारी राज्यात १८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३०१ झाली आहे. शुक्रवारी झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील ११, पुणे इथं ५ तर मालेगाव इथं २ मृत्यू झाले आहेत. या मृत्यूंपैकी १२ पुरुष, तर ६ महिला आहेत. १८ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ९ रुग्ण आहेत,तर ६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर ३ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या १८ मृत्यूपैकी १२ रुग्णांमध्ये (६७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

मृत्यूदर ४.४ टक्के

सध्या राज्यातील कोरोना आजाराचा मृत्यूदर हा ४.४ टक्के आहे. राज्यातील २६९ मृत्यूंचे वयोगटानुसार विश्लेषण केले असता ५० वर्षांखालील व्यक्तींचा मृत्यूदर हा कमी आढळून येतो, विशेषतः २१ ते ३० वर्षे वयोगटात मृत्यूदर ०.६४ टक्के इतका आहे तर त्यापुढील वयोगटात मृत्यूदर वाढताना दिसून येतो.  ६१ ते ७० या वयोगटात मृत्यूदर सर्वाधिक म्हणजे १७.७८ टक्के एवढा आहे. यामुळे ५० वर्षांवरील आणि इतर अतिजोखमीचे आजार असणाऱ्या व्यक्तीमध्ये कोरोना आजारामुळे गुंतागुंत होण्याची शक्यता अधिक असल्याचं अधोरेखित झालं आहे.

हेही वाचा - Coronavirus Update: महाराष्ट्रात पूल टेस्टिंग आणि प्लाझ्मा थेरपीला केंद्राची मंजुरी
पुढील बातमी
इतर बातम्या