death rate in Mumbai : मुंबईतील मृत्यूदर पुन्हा ५ टक्क्यांवर

मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी मागील काही दिवसांपासून रूग्णवाढीचा दर खाली येत आहे. तर मृत्यूदरही खाली आहे. मात्र, आता पुन्हा मृत्यूदरात वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. जूनच्या पंधरवड्यानंतर मुंबईतील मृत्यूदर वाढत आहे. हा मृत्यूदर पुन्हा साडेपाच टक्क्यांवर गेला आहे. याआधी मृत्यू दर ३ टक्क्यांवर होता.

मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून ३८ दिवसांवर गेला आहे. रूग्ण दुपटीचा कालावधी वाढत असला तरी मागील काही दिवसांत मृत्यूदर वाढला आहे. मुंबईत रोज ५० हून मृत्यू होत आहेत. मे महिन्यात साडेपाच ते सहा टक्के असलेला मृत्यूदर जूनच्या दुसऱ्या आठवड्यात तीन टक्क्यांवर आला होता. हा मृत्यूदर पुन्हा साडेपाच टक्क्यांवर पोहोचला आहे. खासगी रूग्णालयांनी गेल्या दोन महिन्यांतील ६९ मृत्यूंची नोंद पालिकेला मागील आठवड्यात दिली. त्यामुळे ही वाढ दिसत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

वांद्रे एच पूर्व विभाग कोरोनाला रोखण्यात आघाडीवर आहे. वांद्रे व खार पूर्व विभागात येणाऱ्या एच पूर्व विभागाचा रुग्ण दुपटीचा कालावधी ८४ दिवसांवर गेला आहे. १ जून रोजी हा कालावधी १८ दिवसांवर होता, तर १० जूनला २५ दिवसांवर होता. तर माटुंगा येथील एफ उत्तर विभागातील रुग्ण दुपटीचा कालावधी ७७ तर भायखळा-ई विभागाचा रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ७४ दिवसांवर गेला आहे. तर एक टक्के पेक्षा कमी रुग्णवाढीचा सरासरी दर नोंदवणारा एच पूर्व हा पहिला विभाग ठरला होता.


हेही वाचा -

G South पालिकेच्या कार्यालयात 'अशी' घेतली जातेय कर्मचाऱ्यांची काळजी

३० मिनिटात कोरोनाचं निदान, पालिकेचं 'मिशन युनिव्हर्सल टेस्टिंग'


पुढील बातमी
इतर बातम्या