मुंबईत हॉटस्पॉटमध्ये कोरोना रुग्ण वाढीचा दर घटला

कोरोना रुग्णवाढीचं मुंबईतील रोजचं प्रमाण आता 6.62 टक्कयांवरून 3.50 टक्क्यांवर आलं आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या भायखळा, वरळी, धारावी परिसरांमध्ये रुग्णवाढीचा दर दहा टक्क्यांवरून 1.6 ते 2.4 टक्के इतका खाली आला आहे. योग्य उपचार पद्धती, क्वारंटाईनची योग्य अंमलबजावणी, जंतूनाशक फवारणी,  रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मल्टी व्हिटॅमिन्ससह सहायक उपचार यामुळे भायखळा आणि माटुंगा परिसरातील रुग्ण कोरोनावर मात करत आहेत. त्यामुळेच हॉटस्पॉट ठरत असलेल्या भायखळा, माटुंगा, धारावी परिसरातील मृत्यूदर सर्वात कमी झाला आहे.

 वरळी, प्रभादेवी, दादर, माहीम, धारावी, सायन, सांताक्रूझ, माटुंगा, ग्रँट रोड, ताडदेव, भायखळा या भागांमधील दैनंदिन रुग्णवाढ कमी होत चालली आहे. धारावी, दादर, माहीम या भागांतील रुग्णवाढीचा दर 2.4 टक्के इतका खाली आला आहे.

पालिकेच्या ई वॉर्डमध्ये (भायखळा, आग्रीपाडा, नागपाडा) आतापर्यंत 2811 कोरोनाबाधित आढळले असले तरी यातील 1275 जण बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत. तर आता 1450 अॅक्टिव्ह केसेस असून यातील 80 टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नसून त्यांची प्रकृती सुधारत आहे.

एफ-उत्तर विभागातील माटुंगा, शीव, वडाळा, अँटॉप हिल परिसरातही आता रुग्णसंख्या कमी होत आहे. येथील दैनंदिन वाढ 1.9 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.  एफ-उत्तर विभागात एकूण रुग्णसंख्या 2239 होती. आतापर्यंत 1008 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर 1095 ऍक्टिव्ह केसमधील 80 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. वॉर्डमध्ये 183 इमारती आणि 22 कंटेनमेंट झोन आहेत. तर आतापर्यंत 136 जणांचा मृत्यू झाला आहे. 

रुग्णवाढ प्रमाण कमी झालेले विभाग

  • ई विभाग – भायखळा-1.6 टक्के
  • जी-उत्तर – धारावी – 2.4 टक्के
  • जी-दक्षिण- वरळी – 2.2 टक्के
  • एच-पूर्व – वांद्रे – 2.3 टक्के
  • ए विभाग – कुलाबा – 2.7 टक्के
  • डी विभाग – ग्रँट रोड – 2.6 टक्के
  • एफ-उत्तर – माटुंगा – 1.9 टक्के

हेही वाचा -

'असे' आहेत मिरा रोड-भाईंदरमधील कंटेन्मेंट झोन

नवी मुंबईतील कंटेन्मेंट झोनची संख्या 30 वर, 'हे' आहेत कंटेन्मेंट झोन


पुढील बातमी
इतर बातम्या