१८ ते ४४ वयोगटातील लसीकरण रखडणार

राज्यात १८ ते ४४ वयोगटातील कोरोना लसीकरण आता रखडणार आहे. देशात लशींचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला आवश्यक लशींचा पुरवठा होऊ शकलेला नाही. 

महाराष्ट्रात सध्या ४५ वर्षांपुढील आणि १८ ते ४४ या वयोगटातील लसीकरण सुरू आहे. लशीचा तुटवडा असल्याने १८ ते ४४ वयोगटातील लसी ४५ वर्षांपुढील गटाच्या दुसऱ्या डोससाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी आलेले लसीचे डोस ४५ वर्षांपुढील व्यक्तींच्या दुसऱ्या डोससाठी वापरा, अशी सूचना महाराष्ट्रातील सर्व लसीकरण केंद्रांना देण्यात आली असल्याचं टोपे यांनी सांगितलं. 

टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील उपलब्ध लस आणि केंद्राकडून पुरवण्यात येणाऱ्या लशीच्या साठ्याची माहिती दिली. राज्यात सध्या कोव्हॅक्सिनचे ३५ हजार डोस उपलब्ध आहेत. तर दुसरा डोस द्यायचा असलेल्यांची संख्या ५ लाखांच्या जवळपास आहे. १८ ते ४४ या वयोगटासाठी राज्य शासनाने खरेदी केलेलं कोव्हॅक्सिनचे पावणेतीन लाख डोस उपलब्ध आहे. तसंच केंद्राकडून आलेले ३५ हजार असे एकूण तीन ते सव्वातीन लाख कोव्हॅक्सिनचे डोस ४५ वर्षापुढील नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी वापरण्याचा निर्णय आरोग्य विभागाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेतला आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली.



हेही वाचा

कोविन पोर्टलमध्ये करण्यात आले हे नवीन बदल, जाणून घ्या प्रक्रिया

ठाण्यात आढळला म्युकोरमायकोसिसचा पहिला रुग्ण

पुढील बातमी
इतर बातम्या