मराठा मोर्चादरम्यान 3918 लोकांवर उपचार

एवढे दिवस सर्वांना वाट पाहायला लावणारा मराठा क्रांती मोर्चा अखेर बुधवारी राज्याच्या राजधानीत म्हणजेच मुंबईत धडकला. मराठा मोर्चाला आतापर्यंत चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे मुंबईतही बुधवारी झालेल्या मोर्चात जवळपास लाखोंच्या संख्येने मराठा बांधव दाखल झाले होते. त्यामुळे मोर्चात सहभागी होणाऱ्या मराठा बांधवांची आरोग्यासंदर्भातील कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, म्हणून आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सोयी-सुविधा मुंबईत 4 ठिकाणी देण्यात आली होती. यावेळी जवळपास चार हजार लोकांना आरोग्य सुविधा पुरवण्यात आली.

3918 लोकांवर किरकोळ उपचार

आझाद मैदानात आणि बॉम्बे जिमखाना येथे महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या आरोग्य केंद्रात तब्बल 3 हजार 918 लोकांवर उपचार करण्यात आले. आझाद मैदानाशेजारील कॅनन पावभाजी सेंटर येथील उपचार केंद्रात संध्याकाळपर्यंत 2 हजार 379 आणि बॉम्बे जिमखाना शेजारील आरोग्य उपचार केंद्रात 1 हजार 539 मोर्चेकऱ्यांवर किरकोळ उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. पॅरोसिटेमॉल, अँटासिड तसेच बँडेज आदी प्रकारचे हे उपचार होते. तर, दोघांना जास्त त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु, त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती ए विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे.

राज्य सरकारची जय्यत तयारी

राज्य सरकारकडून जवळपास 130 सरकारी डॉक्टर आणि 15 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. तर, छत्रपती शिवाजी महाराज मेडिकोसचे डॉक्टरही रुग्णांना मदत पोहोचवण्यासाठी मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज मेडिकोस असोसिएशनने डॉक्टरांना चार ते पाच गटात विभागलं होतं. प्रत्येत गटात 20 डॉक्टर आणि विद्यार्थी तैनात करण्यात आले होते.

डॉक्टरांच्या 5 टीम तैनात

डॉक्टरांच्या 5 टीम सायन, जिजामाता उद्यान (भायखळा), जे. जे. उड्डाणपूल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आझाद मैदान या ठिकाणी रुग्णांच्या सेवेसाठी तैनात करण्यात आल्या होत्या.

लाखो लोकांनी मराठा क्रांती मोर्चात सहभाग घेतला. मोर्चेकऱ्यांना त्वरित सेवा मिळाव्यात यासाठी आम्ही चेंबूरपासून आझाद मैदानपर्यंत पाच टीम तैनात केल्या. प्रत्येक टीममध्ये 20 डॉक्टर आणि विद्यार्थी होते. 

डॉ. राजेश ढेरे , केईएम रुग्णालय, फॉरेन्सिक मेडिसीन विभाग

तसंच आझाद मैदानाच्या बाहेर कुठल्याही व्यक्तीला कसलाही त्रास जाणवू लागला तरी तत्काळ रुग्णवाहिकेची सेवा अर्धा किलोमीटरच्या अंतरावर करण्यात आली होती. तसंच आपात्कालीन परिस्थितीत रुग्णांवर सेंट जॉर्ज रुग्णालयातही उपचार करण्यात आले.

आम्ही मोर्चात सहभागी होणाऱ्यांना वैद्यकीय उपचार तसंच अॅम्ब्युलन्स सेवाही पुरवली. जवळपास 1200 लोकांना आम्ही डोकेदुखी, अॅसिडीटीची औषधं दिली.

विठ्ठल मोरे , ए वॉर्डचे फार्मासिस्ट ,मुंबई महापालिका

रुग्णवाहिकेला करुन दिला रस्ता

शिस्तबद्धपद्धतीने पार पडलेल्या मोर्चात संवेदनशीलता आणि त्यासोबतच माणूसकीही दिसून आली. आझाद मैदानात एका महिलेला अचानक चक्कर आली, तेव्हा तत्काळ रुग्णवाहिकेची सेवा देण्यात आली. मोर्चेकरांनी अजिबात वाट न अडवता तत्काळ त्या रुग्णवाहिकेला जागा करुन दिली.


हेही वाचा

मराठा समाजाच्या 'या' मागण्या मान्य

पुढील बातमी
इतर बातम्या