ठाण्यातील बगळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच

ठाण्यातील वाघबीळ परिसरातील तलावाजवळ मागील आठवड्यात १५ बगळे मृतावस्थेत आढळले होते. या बगळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच झाल्याचं निष्पन्न झालं आहे. या पार्श्वभूमीवर आता ठाणे महापालिका प्रशासनाने नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. शहरात मृतावस्थेत आढळणाऱ्या पक्ष्यांची माहिती कळवण्याचं आवाहन पालिकेनं नागरिकांना केलं आहे.

वाघबीळ येथील विजय नगरी भागात छोटा तलाव आहे. या परिसरात मोठय़ा प्रमाणात ढोकरी बगळे येत असतात. बुधवारी येथे १५ बगळे मृतावस्थेत आढळून आले. या घटनेच्या दोन दिवसांनंतर याच परिसरात १ गिधाड मृतावस्थेत आढळून आले होते.  या पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आल्यानंतर या सर्व पक्ष्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे समोर आले होते. 

ठाणे महापालिका प्रशासनाने सतर्कतेचा उपाय म्हणून नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. या साथीमुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि मृत झालेल्या पक्ष्यांची माहिती तात्काळ नियंत्रण कक्षास द्यावी, असं आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी केलं आहे.

ठाणे महापालिका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली हा नियंत्रण स्थापन करण्यात आला आहे. नागरिकांनी मृत पक्ष्यांची माहिती प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षातील टोल फ्री क्रमांक १८००२२२१०८ तसेच ०२२ २५३७१०१० या हेल्पलाइनवर द्यावी, असं आवाहन पालिकेने केलं आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या