Advertisement

Avian Flu: बर्ड फ्ल्यूचा माणसाला धोका आहे का?

बर्ड फ्ल्यू विषाणू मानवी शरीरात प्रवेश करू शकतो का? यासंदर्भात जाणून घ्या महत्त्वपूर्ण माहिती

Avian Flu: बर्ड फ्ल्यूचा माणसाला धोका आहे का?
SHARES

कोरोनानंतर सध्या राज्यावर बर्ड फ्ल्यूचं सावट घोंघावत आहे. मुंबईत देखील बगळ्यांमध्ये बर्ड फ्ल्यू विषाणू आढळला. राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात सर्वप्रथम फ्लूचा धोका नोंदवला गेला.झालावाड इथं सुमारे ५० कावळ्यांचा मृत्यू झाला होता.

जयपूर आणि जोधपूरमध्येही अशीच प्रकरणं नोंदवली गेली. राजस्थानानंतर इंदूरमध्ये जवळपास ५० कावळ्यांची शव सापडल्यानं मध्य प्रदेशातील अधिकाऱ्यांना सतर्क केलं गेलं. दरम्यान, ठाणे येथील घोडबंदर, विजय गार्डन कॉलनीजवळ बुधवारी ६ जानेवारीला २ पोपट, ८ हेरॉन्स आणि कावळा यासह १५ पक्षी मृतावस्थेत सापडले.

बर्ड फ्लूच्या बातम्या येताच कोंबड्यांच्या (Chickens) पोल्ट्री (poultry) खाली केल्या जातात, लाखो पक्षांना मारलं जातं, चिकनचे दर एकाएकी खाली उतरतात. उलटसुलट चर्चा सुरु होता, आणि लोकांमध्ये दहशत पसरते. पण, हा रोग आहे तरी काय? पाहूयात.

१) बर्ड फ्ल्यू म्हणजे काय?

बर्ड फ्लू हा पक्षांमध्ये पसरणारा एक संसर्गजन्य रोग आहे. ज्याला बर्ड फ्लू वा एवियन एन्फ्लुयेन्झा (avian influenza) असंही म्हणतात. जो पक्षांच्या लाळेवाटे, विष्ठेवाटे किंवा त्यांच्या डोळ्यांवाटे इतर पक्ष्यांमध्ये पसरतो. 

पक्ष्यांनी पंख जरी झटकले, तरी हा विषाणू इतरत्र पसरु शकतो. ज्या पक्षांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते, ते पक्षी यामुळे दगावतात. पक्षांद्वारेच हा रोग माणसांपर्यंत पोहचतो. जे लोक पोल्ट्री व्यवसाय करतात, वा कोंबड्या वा इतर पक्षांची ज्यांचा जवळचा संबंध आहे, त्यांच्यामध्ये हा रोग पसरण्याची शक्यता जास्त असते.

२) माणसांवर परिणाम होतो का?

१९००च्या दशकात इटलीमध्ये सर्वात आधी हा फ्ल्यू आढळला होता. त्यानंतर १९६१ मध्ये दक्षिण आफ्रिकेत या फ्ल्यूमुळे लाखो पक्षी संक्रमित झाले. डिसेंबर १९८३ ला पेन्सिलवेनिया आणि व्हर्जिनियात या फ्लूनं थैमान घातलं. त्यानंतर ५० लाख कोंबड्या आणि बदकांना मारण्यात आलं.

१९९७ मध्ये हाँगकाँगमध्ये १८ लोकांना हा फ्लू झाला. त्यातील ५ लोकांचा मृत्यू झाला. बर्ड फ्लूमुळे मृत्यू होण्याची ही जगातील पहिलीच घटना होती. त्यानंतर हाँगकाँगमद्ये तब्बल १५ लाख पक्षांना मारण्यात आलं. २००३ साली नेदरलँडमध्ये ८४ लोकांना H7N7 या नवी स्ट्रेनचा फ्लू झाला, त्यातील एकाचा मृत्यू झाला.

२०१९ ला जगभरात तब्बल १ हजार ५६८ लोकांना या फ्लूची लागण झाली. तर त्यातील ६१६ लोक दगावले, हा H7N9 प्रकारातला फ्लू होता.

३) बर्ड फ्ल्यू किती धोकादायक आहे?

१९९७ मध्ये पहिल्या मानवी घटनेपासून H5N1 नं ६० टक्के लोकांचा बळी घेतला आहे.

४) कोणत्या भारतीय राज्यानं बर्ड फ्ल्यूच्या घटनेची पुष्टी केली आहे?

उत्तर प्रदेश व्यतिरिक्त केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि गुजरात अशा इतर सहा राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यूची नोंद झाली आहे.

५) मुंबईत कोंबडी पालन सुरक्षित आहे का?

बर्ड फ्ल्यूची भीती लक्षात घेता पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी असं प्रतिपादन केलं की, राज्यात कोणतंही प्रकरण नाही आणि लोक कोणत्याही भीतीशिवाय चिकन किंवा अंडी खाऊ शकतात.

६) मानवांमध्ये फ्ल्यूची लक्षणं कोणती?

बर्ड फ्ल्यूची लागण झाल्यानंतर ताप येणं, घशात खवखव होणं, वा जास्त इन्फेक्शन होणं, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणं, पित्त वा कफचा त्रास आणि रोग जास्त पसरला असल्यास निमोनिया होण्याची शक्यता जास्त असते.

ही सगळी लक्षणं सध्याच्या कोरोना विषाणूंच्या लक्षणांशी मिळती-जुळती आहेत. त्यामुळं सध्याच्या काळात हा विषाणू धोकादायक ठरु शकतो.

७) एव्हीयन फ्लूसाठी काही लस आहे का?

बर्ड फ्लूवर औषध उपलब्ध आहेत. टॅमी फ्लूच्या गोळ्यांद्वारे हा रोग बरा होतो. त्यामुळं बर्ड फ्लू आल्यानंतर सरकार टॅमी फ्लूच्या (tamiflu) गोळ्यांचा साठा करणं सुरु करतं.

याशिवाय रेलेन्झा (relenza), रॅपीवॅप (Rapivab) याही गोळ्या डॉक्टरांकडून दिल्या जातात. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या घेऊ नये. कारण, टॅमी फ्लूसह इतर गोळ्यांची दुष्परिणामही होऊ शकतात.



हेही वाचा

बर्ड फ्ल्यूची धास्ती, चिकननंतर अंड्यांच्या किंमतीवरही परिणाम

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा