मुंबईतील अनेक पूल धोकादायक स्थितीत असल्याचे निदर्शनास आले आहेत. यामध्ये कांदिवली आणि मालाडमधील वाहतूक पुलांसह पादचारी पूल धोकादायक असल्याच्या अनेक तक्रारी पालिकेच्या पूल विभागाकडे आल्या होत्या.
त्यानुसार पालिकेच्या पूल विभागाने येथील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. यामध्ये तब्बल 7 पूल पूर्णपणे धोकादायक अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये तीन वाहतूक, तर चार पादचारी पुलांचा समावेश आहे. त्यामुळे पालिका हे 7 पूल तोडून लवकरच नवीन पूल बांधण्याच्या विचारात आहे.
धोकादायक घोषित करण्यात आलेल्या पुलांमध्ये महालक्ष्मी डेअरी फार्म, हनुमान नगर कांदिवली पूर्व पादचारी पूल, गावदेवी रोड कांदिवली पूर्व पादचारी पूल, नरवणे ट्रान्झिट कॅम्प आणि झोपडपट्टी क्षेत्र यांस जोडणारा पादचारी पूल, रामनगर चाळ बिहारी टेकडी, कामराज चाळ कैंपो टोबॅको जवळ, कांदिवली पूर्व येथील पादचारी पूल, साईनगर कांदिवली (प.) येथील वाहतूक पूल व आप्पा पाडा, गांधी टेकडी, मालाड येथील वाहतूक पूलाचा समावेश आहे.
दरम्यान, धोकादायक बनलेले 7 पूल तोडून त्यांची पुनर्बांधणी करण्यासाठी पालिकेने 24 महिन्यांचा कालावधी कंत्राटदाराला दिला आहे. तर या पुलाची कामे पावसाळ्यानंतर सुरू होणार असून 2027 पर्यंत पूल वाहतुकीसाठी खुले करण्याचे पालिकेचे ध्येय आहे. या पुलांसाठी पालिका 20 कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा