Coronavirus Updates: रुग्णांवर उपचार न केल्यास परवाना रद्द

करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, शासकीय आरोग्य यंत्रणा या संसर्गाला सर्वतोपरी सामोऱ्या जात आहेत. खासगी क्षेत्रातील देखील अनेक डॉक्टर आणि रुग्णालये सरकारला सहाय्य करीत आहेत. परंतु, काही डॉक्टर आणि खासगी रुग्णालयं त्यांच्या ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी शासनाकडं येत आहेत. त्यामुळं अनेक रुग्णांना उपचाराविनाच राहावं लागत आहे.

कोणत्याही रुग्णाला योग्यवेळी उपचार मिळणं गरजेचं असतं. त्यामुळं रुग्णांवर उपचार केले नाहीत, तर त्यांचा परवाना रद्द केला जाईल', असा इशारा आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिला आहे.

आरोग्याच्या दृष्टीने ही मोठी आणीबाणी देशावर आलेली आहे. अशा काळात सर्व घटक देशसेवा म्हणून आपापल्या परीने काम करीत आहेत. पण देशासमोरील या संकटाला सामोरे जात असताना, आरोग्य क्षेत्रातीलच काही मोजकी मंडळी रुग्णसेवा नाकारत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या क्षेत्रात काम करणारे सर्वच डॉक्टर आणि रुग्णालयांच्या विश्वस्तांनी आपल्या रुग्णालयात येणाऱ्या सर्व रुग्णांना आपल्या परीने सेवा द्यावी. आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये करोनाची काही लक्षणे आढळल्यास, परिसरातील शासकीय आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबतची माहिती द्यावी, असंही त्यांनी म्हटलं.

खासगी डॉक्टरांच्या ओपीडी अथवा रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना सेवा देण्याचे नाकारल्यास संबंधित रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा -

Coronavirus Updates: कोरोनाची घरी तपासणी, 'या' हेल्पलाइन संपर्क केल्यास मिळणार सल्ला

Coronavirus Updates: मुंबईतील अनेक भागांत खासगी दवाखाने बंद


पुढील बातमी
इतर बातम्या