२ ऑगस्टपासून सुरू होणार अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तींचं लसीकरण

लसीकरण हा कोरोनावरील (coronavirus) जालीम उपाय असल्यानं जगभरात लसीकरण केलं जात आहे. नागरिकांचा या लसीकरणाला चांगला प्रतिसाद ही मिळत आहे. परंतू, अद्याप लसीकरण सुरू होऊन काही महिने उलटले असले तरी, अद्याप काहींना लस मिळालेली नाही. विशेषत: काही आजारांमुळं अंथरुणाला खिळून असणाऱ्या रुग्णांना व वयोवृद्ध नागरिकांना कोरोनावरील लस घेता आला नाही. त्यामुळं या नागरिकांसाठी कोरोना (covid 19) लसीकरणाची विशेष सुविधा आरोग्य विभागानं उपलब्ध करून दिली आहे. अशा व्यक्तींच्या माहितीची ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर पथकामार्फत त्यांचं लसीकरण केलं जाईल, असे सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

या लसीकरणासाठी आतापर्यंत महापालिकेकडे (bmc) ४ हजार ४८८ व्यक्तींनी नोंदणी केली आहे. या व्यक्तींच्या लसीकरणासाठी आरोग्य पथकांच्या माध्यमातून तपासणी सुरु करण्यात आली आहे. या लसीकरणासाठी नोंदणी प्रक्रियाही सुरु आहे. नोंदणी केलेल्या व्यक्ती लसीकरणासाठी पात्र आहेत का हे पाहण्यात येणार आहे. लसीकरणासाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र बंधनकारक असून त्यानंतर कोविशिल्ड लस देण्यात येणार आहे. अंथरुणाला खिळून असलेले रुग्ण व वयोवृद्धांना घरी जाऊन आरोग्य पथकाने लस द्यावी, यासाठी उच्च न्यायालय आग्रही होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

ज्या व्यक्ती अंथरुणाला खिळून आहेत व पुढील ६ महिने परिस्थिती तशीच राहण्याची शक्यता असेल, अशा व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी ही विशेष सुविधा आहे. अशा व्यक्तींची नावे व पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरुणाला खिळून असण्याचं कारण आणि ही व्यक्ती, रुग्ण लसीकरण करून घेण्यास पात्र असल्याचे डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र इत्यादी माहिती covidvaccsbedridden@gmail.com यावर पाठविण्याचे आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे.

आतापर्यंत लसीकरण

  • पहिला डोस ५१४९५०४
  • दुसरा डोस १५७५९३८

६० पेक्षा जास्त वयोगट

  • पहिला डोस ९८२४१३
  • दुसरा डोस २८३६७७


हेही वाचा -

मुंबई महापालिकेचा पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात

महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर


पुढील बातमी
इतर बातम्या