महाराष्ट्राला दरमहा ३ कोटी लसींची गरज- राजेश टोपे

महाराष्ट्राला (maharashtra) दर महिन्याला ३ कोटी लशींचा पुरवठा व्हावा, अशी विनंती केंद्र सरकारला करण्याचा ठराव राज्य विधिमंडळात मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना लस पुरवठ्यासंबंधी विनंती करणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी सांगितलं की, कोरोना विषाणू (coronavirus) प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राने आतापर्यंत सर्वाधिक लोकसंख्येचं लसीकरण केलं असून एका दिवसात जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करण्यातही महाराष्ट्र आघाडीवर आहे. आपण दिवसाला १५ लाख लोकांचं लसीकरण करू, अशी यंत्रणा तयार केलेली आहे. परंतु लशींच्या पुरवठ्याअभावी आपल्याला लसीकरणात मर्यादा येत आहेत. दिवसाला केवळ २ ते ३ लाख लोकांनाच लस टोचता येत आहे.

आपल्याला ३ दिवसांपूर्वी ७ लाख डोस केंद्राकडून मिळाले होते. हे डोस १२ जुलै दिवसअखेर संपतील. आपल्याला आतापर्यंत ३.६० कोटी डोस मिळाले आहेत. त्यापैकी २५ लाख डोस राज्य सरकारने थेट विकत घेतलेले आहेत. मुंबई, ठाणे, विदर्भ व अन्यत्र ठिकाणी लशींच्या पुरवठ्याअभावी लसीकरण बंद होते. या भागात सोमवारी दुपापर्यंत पुरवठा होईल, असं राजेश टोपे (rajesh tope) यांनी सांगितलं.

हेही वाचा- मुंबईतील 'या' भागांत मंगळवारी पाणीपुरवठा बंद अथवा कमी दाबानं होणार

नाहीतर निर्बंध रद्द करा

राज्यातील कडक निर्बंधांबाबत बोलताना राजेश टोपे म्हणाले की, राज्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि विदर्भात रुग्णसंख्या कमी होत आहे, तर कोकण, पश्चिम महाराष्ट्रात रुग्णसंख्या अधिक आहे. राज्यभर निर्बंध लागू असले तरी त्यांचं काटेकोर पालन होत नाही, असंच दिसून येत आहे. 

निर्बंधांची कडक अंमलबजावणी झाली, तर रुग्णसंख्या आटोक्यात येईल, अन्यथा ते काढून टाकावेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांबरोबर घेतलेल्या बैठकीत मी हे मत व्यक्त केलं आहे. आपल्याला जनहिताचा निर्णय घ्यावा लागेल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत अभ्यास करून योग्य निर्णय घेतील, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा- तर निवडणुकीत सत्ताधारी पक्षांवर बहिष्कार टाकू; राज्यातले व्यापारी संतापले

पुढील बातमी
इतर बातम्या