Advertisement

तर निवडणुकीत सत्ताधारी पक्षांवर बहिष्कार टाकू; राज्यातले व्यापारी संतापले

कोरोनामुळं मुंबईचं अर्थचक्र हळुहळू रुळावर येत असतानाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं पुन्हा ब्रेक लावला. त्यामुळं पुन्हा परिस्थिती काहीशी जैसे थेच झाली आहे.

तर निवडणुकीत सत्ताधारी पक्षांवर बहिष्कार टाकू; राज्यातले व्यापारी संतापले
SHARES

कोरोनामुळं मुंबईचं अर्थचक्र हळुहळू रुळावर येत असतानाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं पुन्हा ब्रेक लावला. त्यामुळं पुन्हा परिस्थिती काहीशी जैसे थेच झाली आहे. मात्र, यामध्ये व्यापारी वर्गाचं मोठं नुकसान होत असून, आता महिन्याचा खर्च आणि कामगारांचे पगार द्यायचा कसा? असा सवाल उपस्थित होत आहे. शिवाय, राज्य सरकारच्या नियमावलीनुसार दुकानं ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची परवानगी असल्यामुळं व्यवसाय डबघाईला आल्याचं व्यापरकर्त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं आता सरकारनं व्यापाऱ्यांच्या हिताचा निर्णय लवकरात लवकर घेतला नाही, तर सत्ताधारी पक्षांवर बहिष्कार टाकू, असा इशारा व्यापारी वर्गानं दिला आहे.

मुंबईतील कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असल्यानं निर्बंधातही शिथिलता आणावी, अशी मागणी फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स असोसिएशननं केली आहे. संध्याकाळी ४ पर्यंतची वेळमर्यादा असल्यानं व्यवसाय डबघाईला आला असून येत्या आठवड्यात दुकानं पूर्णवेळ खुली ठेवण्यास परवानगी दिली नाही तर आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षांवर बहिष्कार टाकू, असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.

आठवड्यातील केवळ पाच दिवस, तेही सायंकाळी ४ पर्यंतच व्यवसायाची परवानगी असल्यानं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. शनिवार-रविवार हे महत्त्वाचे दिवसदेखील आमच्या हातात नाहीत. तुलनेनं कमाई होत नसल्यानं २५ टक्के दुकानं आजही बंद आहेत. राज्यात ज्या ठिकाणी रुग्णवाढीचा दर ५ टक्क्यांवर आला आहे. तिथे निर्बंध पूर्णपणे शिथिल करावे. आता आमची जमापुंजी संपली आहे. कर्मचारीही हवालदिल झाले आहेत.

सरकारनं मदतीचा हात पुढे केला नाही. त्यामुळं काही दिवसांत निर्बंध शिथिल झाले नाहीत तर व्यापारी सरकारच्या विरोधात निदर्शनं करतील. किंबहुना आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षांवर आम्ही बहिष्कार टाकू असं फेडरेशनचं म्हणणं आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा