रेमडेसिव्हिर इंजेक्शन कोणत्या रुग्णाला द्यायचे आहे, त्याची निश्चित वैद्यकीय माहिती प्रिस्किप्शनसोबत देणं आता बंधनकारक करण्यात आलं आहे. तसंच रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यापूर्वी रुग्णाची संपूर्ण माहिती देणं बंधनकारक आहे. या बाबतचे महत्त्वाचे निर्देश आरोग्य विभागाने जारी केले आहेत.
कोरोनावर रेमडेसिव्हिर हे इंजेक्शन अत्यंत उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे रेमडेसिव्हिरची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. परिणामी अनेक ठिकाणी रेमडेसिव्हिरचा तुटवडा जाणवत आहे. प्रत्येक संशयित रुग्णाला हे इंजेक्शन देण्याचे प्रमाण वाढलं आहे. या पार्श्वभूमीवर रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यापूर्वी रुग्णाची संपूर्ण माहिती देणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
रुग्णाच्या माहितीसोबत रुग्णाचे नाव, मोबाइल नंबर, पत्ता, नोंदणी क्रमांक, रुग्णालयामध्ये दाखल करताना दिलेली माहिती द्यावी लागणार आहे. हे इंजेक्शन देण्यापूर्वी त्या रुग्णाची ऑक्सिजनची पातळी, ताप किती आहे, धाप लागते का, खोलीतील एसपीओटू पातळी, श्वास घेण्यातील अडसर ही संपूर्ण माहिती रुग्णाला दाखल केलेल्या दिवसापासून देणे अपेक्षित आहे.
या माहितीसोबत रुग्णाचे पॅथालॉजीचे निदान अहवालही जोडायचे आहेत. या अहवालांसोबत एचआरसीटी अहवाल, रक्ताच्या चाचण्या, इतर सहआजार तसेच रेमडेसिवीर इंजेक्शन सुरू करण्याची निकड ही माहितीही रुग्णालयाने या प्रिस्क्रिप्शनसोबतच्या फॉर्मला जोडायची आहे. रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर कोणती लक्षणे दिसून आल्यानंतर, तसेच कोणते वैद्यकीय निरीक्षण केल्यानंतर रेमडेसिवीर इंजेक्शन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला, यासंदर्भात माहिती द्यायची आहे.
हेही वाचा -