निवासी डॉक्टरांना न्यू इअर गिफ्ट, स्टायपेंडमध्ये ५ हजारांची वाढ

गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यातील चार मेडिकल कॉलेजमधील निवासी डॉक्टरांना स्टायपेंड न मिळण्याच्या निषेधार्थ इतर कॉलेजमधील निवासी डॉक्टरांनी आंदोलन पुकारलं होतं. या आंदोलनला अखेर यश मिळालं असून नववर्षाच्या सुरूवातीलाच वैद्यकीय शिक्षण विभागानं निवासी डॉक्टरांच्या स्टायपेंडमध्ये ५००० रुपयांची वाढ केली आहे.

स्टायपेंडसाठी १०० कोटी

मंगळवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत निवासी डॉक्टरांच्या स्टायपेंडमध्ये तब्बल ५००० रुपयांची वाढ करण्यात आली असून जानेवारी महिन्यांपासून निवासी डॉक्टरांना ५५००० रूपये वेतन मिळणार आहे. त्याशिवाय लातूर, नागपूर, आंबेजोगाई आणि औरंगाबाद या चार वैद्यकीय कॉलेजमधील निवासी डॉक्टरांच्या रखडलेला स्टायपेंड देण्यासाठी १०० कोटी रुपये डीएमईआर म्हणजेच वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाला दिले आहेत. त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसात या सर्व निवासी डॉक्टरांचा रखडलेला स्टायपेंड देण्यात येणार आहे.  निवासी डॉक्टरांनाही सातवा वेतन आयोग लागू व्हावा याबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली असून येत्या काही दिवसात त्यावर निर्णय घेण्यात येईल असं या बैठकीत सांगण्यात आलं. 

दर तीन वर्षात निवासी डॉक्टरांच्या स्टायपेंडमध्ये वाढ करण्यात यावी, असा नियम असताना, २०१८ साली मात्र स्टायपेंडमध्ये वाढ करण्यात आली नव्हती. या विरोधात अनेक रूग्णालयातील डॉक्टरांनी विविध प्रकारे आंदोलन केलं होतं. वैद्यकीय शिक्षण विभागानं भरघोस स्टायपेंड दिल्यानं सर्व निवासी डॉक्टरांमध्ये आनंदाच वातावरण आहे. 

- लोकेश चिरवटकर, अध्यक्ष, सेंट्रल मार्ड


हेही वाचा - 

स्टेथोस्कोपच्या जागी हातात फळ आणि वजनकाटा


पुढील बातमी
इतर बातम्या