अल्झायमर, स्मृतीभ्रंशाच्या रुग्णांसाठी मुंबईत 'मेमरी क्लिनिक’

अल्झायमर आणि स्मृतीभ्रंशाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. यासाठी जिल्हा रुग्णालयांमध्ये ‘मेमरी क्लिनिक’ सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, ठाणे आणि सिंधुदुर्ग येथे अशा रुग्णांसाठी ‘डे केअर सेंटर’ सुरु करण्यात येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली आहे. आरोग्यमंत्र्यांच्या दालनात याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.

आयुर्मानात वाढ झाल्याने अल्झायमर आणि स्मृतीभ्रंशाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. ठाणे येथील मनोरुग्णालयात दर आठवड्याला साधारणत: १४०० जणांची तपासणी केली जाते. त्यातील किमान सहा ते सात रुग्ण अल्झायमर आणि स्मृतीभ्रंशाचे आढळून येत आहेत. सामाजिक भीतीपोटी बरेच रुग्ण उपचारांसाठी पुढे येत नाहीत. याकरिता राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत अभियान स्वरूपात जाणीव जागृतीचे उपक्रम हाती घेण्यात येत आहेत.

डॉ. दीपक सावंत, आरोग्यमंत्री

या ठिकाणी सुरू करणार डे केअर सेंटर

पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, ठाणे आणि सिंधुदुर्ग या सहा ठिकाणी पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर ‘डे केअर सेंटर’ सुरु केले जाणार आहेत. त्यामध्ये रुग्णाच्या कुटुंबियांचे समुपदेशन करण्यात येईल. त्याचबरोबर रुग्णाच्या सुश्रुषेविषयी मार्गदर्शन करण्यात येईल. या आजाराबाबत सामान्यांमध्ये जाणीवजागृती करणे आवश्यक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

अल्झायमरसाठी अर्ली डिटेक्शन सेंटर

मेमरी क्लिनिकच्या माध्यमातून अल्झायमरविषयी 'अर्ली डिटेक्शन सेंटर' सुरु करण्यात येईल. त्याद्वारे रुग्णांच्या स्मरणशक्तीची विविध चाचण्यांच्या माध्यमातून तपासणी करण्यात येईल. स्मरणशक्तीविषयी येणाऱ्या अडचणींचे अवलोकन करून त्यांचे वर्गीकरण केले जाईल. त्यानंतर रुग्णावर औषधोपचार करण्यात येतील.


हेही वाचा

कर्करोगावर मात केलेले रुग्ण करणार कर्करोगग्रस्तांची सेवा!

पुढील बातमी
इतर बातम्या