दहीहंडीचा उत्साह संपला, 15 गोविंदा अजूनही रुग्णालयात

दरवर्षी दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. या सणासाठी गोविंदा महिन्याभरापासून सरावाला लागतात. पण, गोविंदांचा अतिउत्साह आणि सुरक्षेबाबत न घेतलेली काळजी त्यांच्या अंगलट येते आणि अनेकदा गोविंदा जखमी होतात.

मंगळवारी रात्री उशिरा संपलेल्या दहीहंडी सणात एकूण 202 गोविंदा जखमी झाले. त्यातले 15 जण अजूनही वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उपचार घेत असलेल्या गोविंदांपैकी काहींच्या हाताला तर काहींच्या पायाला फ्रॅक्चर झालं आहे, तर काहींच्या डोक्याला मार बसला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टर सांगतात.

ताडदेवमधील नामदेववाडीत राहणारा सुनिल कदम (29) हा आपल्याच परिसरातील दहीहंडी फोडत असताना तिसऱ्या थरावरुन खाली कोसळला. त्याच्या हाताला जबर मार बसला आहे. डॉक्टरांनी ऑपरेशन करुन हातात प्लेट्स बसवायला सांगितलं आहे. सध्या त्याच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डिस्चार्ज देण्यासाठी आणखी काही दिवस लागतील, असं तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं.

हितेश तांबे (18) हा नालासोपाऱ्यात राहणारा असून त्याच्यावर सध्या नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. के. के. मित्र मंडळातील गोविंदांनी थरावर थर रचण्यास सुरुवात केली आणि पहिल्याच थरावरुन हितेश खाली कोसळला. त्याच्या पायाला जबर मार बसला आहे. त्याच्या पायावर छोटीशी शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. त्याला दोन-तीन दिवसांत डिस्चार्ज मिळेल असं त्याची बहीण निकिता तांबे यांनी सांगितलं.

रत्नागिरीतील कासे गावात आयोजित केलेल्या दहीहंडीत 17 वर्षांची सोनल सुर्वे ही गंभीर जखमी झाली आहे. दहीहंडी फोडण्यासाठी सोनल पहिल्या थरावर चढली. त्याचवेळी पाय सरकून ती खाली दगडावर आपटली. डोक्याला जबरदस्त मार लागल्याने तिच्या डोक्यातून खूप रक्तस्राव झाला. तातडीने तिला रत्नागिरीत सरकारी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला शीव रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

मंगळवारी रात्रीपर्यंत 202 गोविंदा जखमी झाल्याची नोंद करण्यात आली. त्यापैकी 187 गोविंदांवर उपचार करून सोडण्यात आलं. तर, 15 गोविंदा अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत.

सध्या रुग्णालयात दाखल झालेल्या गोविंदांमध्ये डोक्याला मार लागणे, हाताला आणि पायाला फ्रॅक्चर होणे आदींची संख्या अधिक आहे. चिराग पांचाळ (24) आणि वीरेंद्र विश्वकर्मा (19) हे गोविंदा दहीहंडीच्या काळात दुचाकीवरून अपघात झाल्याने रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्या दोघांच्याही पायाला फ्रॅक्चर झालं आहे. त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तर, हे दोन्ही अपघात भरधाव वेगाने गाडी चालवल्यामुळे झाल्याचं गोविंदा मंडळातील कार्यकर्त्यांनी सांगितलं. वीरेंद्रच्या पायाला फ्रॅक्चर झालं असून त्याच्या चेहऱ्यावर जखमा आहेत. सुरक्षिततेची काळजी घेतली नसल्याने उत्साहाचे वातावरण आणणारी दहीहंडी अनेकांच्या घरी निराशा घेऊन आल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे.

रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गोविंदाची संख्या

सेंट जॉर्ज रुग्णालय – 2

केईएम रुग्णालय – 1

जे.जे. रुग्णालय – 1

नायर रुग्णालय – 4

सायन रुग्णालय – 4

राजावाडी रुग्णालय - 3

यावर्षीच्या दहिहंडी सणात 2 गोविंदांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.


हेही वाचा

...म्हणून मुंबईतल्या या दहीहंडी ठरल्या विशेष!

पुढील बातमी
इतर बातम्या