मुलगा गमावल्यानंतर म्हैसकर दाम्पत्य वर्षभरात बनले आई-बाबा!

मनिषा म्हैसकर आणि मिलिंद म्हैसकर प्रशासकीय सेवेतील आघाडीची नावं. या दाम्पत्याने वर्षभरापूर्वी आपला एकुलता एक २२ वर्षांचा मुलगा मन्मथ याला गमावलं. मन्मथच्या जाण्याने त्यांच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली होती. पण ही पोकळी लवकरच भरून निघणार आहे. कारण म्हैसकरांच्या घरात जुळ्या मुलींचा जन्म झाला आहे.

आयव्हीएफ तंत्रज्ञानाने, सरोगेट मातेच्या पोटी या जुळ्या मुलींचा जन्म झाला आहे. त्यामुळे म्हैसकर दाम्पत्य सध्या आनंदात आहेत. या जुळ्या मुलींच्या रुपानं आमच्या आयुष्यात नवी पहाट आली असून हे केवळ आणि केवळ तंत्रज्ञानामुळं शक्य झाल्याची प्रतिक्रिया मनिषा म्हैसकर यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली.

मन्मथचं जाणं दु:खद

मिलिंद म्हैसकर सध्या म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तर मनिषा म्हैसकर सध्या शहर विकास विभागाच्या प्रधान सचिव आहेत. गेल्या वर्षी म्हैसकर यांनी म्हाडा उपाध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारून जेमतेम काहीच दिवस झाले होते, तेव्हा त्यांच्या एकुलत्या एक मुलानं, मन्मथनं जुलै २०१७ मध्ये आत्महत्या केली. एकुलत्या एक मुलाच्या जाण्यानं म्हैसकर दाम्पत्य कसे खचले, मुलाच्या जाण्यानं आपल्या आयुष्यात कशी पोकळी निर्माण झाली आणि मन्मथशी नातं कसं होत? या सर्वांची उकल मिलिंद म्हैसकर यांनी एका पत्रातून केली होती.

तंत्रज्ञानाची घेतली मदत

मन्थमनच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी म्हैसकर दाम्पत्यांनी डिसेंबरमध्ये पुन्हा आई-बाबा होण्याच्या निर्णय घेतला. त्यानुसार आयव्हीएफ तज्ज्ञ डाॅ. जतीन शहा यांच्या मदतीनं सरोगसी करण्याचं ठरवलं. त्यानुसार प्रक्रियेला सुरूवात झाली. म्हैसकर दाम्पत्याच्या या निर्णयाबाबत त्यांच्या काही जवळच्या मित्रांनाच माहीत होतं.

लवकरच घरी जाणार

दरम्यान आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात सरोगेट मातेनं दोन जुळ्या मुलींना जन्म दिला असून या मुली सध्या रूग्णालयात आहेत. शुक्रवारपर्यंत या मुलींना म्हैसकर कुटुंबिय घरी नेणार असल्याचं समजतं आहे.

पुन्हा आनंद

वर्षभरापूर्वीचा काळ अत्यंत कठीण होता, या काळात ज्यांनी ज्यांनी आपल्या साथ दिली, त्या सर्वांचे आभार म्हैसकर दाम्पत्यांनी मानले आहेत. तर तंत्रज्ञान आणि देवाचेही आभार मानले असून आता आपल्या एका नव्या अायुष्याला सुरूवात होणार असल्याचं सांगत या मुलींच्या येण्यानं आपल्या आयुष्यात पुन्हा आनंद आल्याचंही सांगितलं आहे.


हेही वाचा-

आयएएस अधिकाऱ्याच्या मुलाची आत्महत्या


पुढील बातमी
इतर बातम्या