नवी मुंबईत अनलाॅकनंतर कोरोना रुग्णसंख्या, मृत्यूदरात मोठी वाढ

नवी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या ८५१८ झाली आहे. तर मृतांचा आकडा २७८ वर गेला आहे. धक्कादायक म्हणजे लाॅकडाऊन हटवल्यानंतर नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांची संख्या झपाट्याने वाढली आहे. एका महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या तब्बल ५ हजार ४५५ ने वाढली आहेत. तर मृतांची संख्या ९६ वरुन २७८ झाली आहे

एका महिन्यात नवी मुंबईतील मृत्यूदर ३.१३ टक्के वरून ३.२६ टक्के झाला आहे. राज्य शासनाने ८ जूननंतर मिशन बिगीन अगेन सुरू केले. अनलाॅक झाल्यानंतर लोक मोठ्या संख्येने बाहेर पडू लागले. मात्र, मास्क न घालणे, सामाजिक अंतर न पाळणे अशी बेफिकीरी लोक दाखवत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे ९ जुलैपर्यंत एका महिन्यात रुग्णसंख्या वेगाने वाढली.  

९ जूनला नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या ३०६३ होती. तर मृतांचा आकडा ९६ होता. ९ जुलैला रुग्णांची संख्या ८५१८ वर गेली आहे. म्हणजे एका महिन्यात तब्बल ५ हजार ४५५  रुग्ण वाढले आहेत. महिनाभरात रोज सरासरी २०० च्या जवळपास नवे रुग्ण वाढले आहेत. तर मृत्यूचं प्रमाणही वाढलं आहे.

जूनच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत एकूण ९६ मृत्यू होते. दिवसाला सरासरी २ ते ३ मृत्यू होत होते. मात्र, महिनाभरात मृतांची संख्या ९६ वरून २७८ झाली आहे. रुग्ण संख्या आणि मृत्यू वाढण्याबरोबरच बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढली आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत ५०८३  रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ६० टक्के आहे.  


हेही वाचा - 

मास्क न लावताच घराबाहेर पडणाऱ्यांवर पालिकेची कारवाई

मुंबईत आतापर्यंत ३ लाख ६४ हजार कोरोना चाचण्या

पुढील बातमी
इतर बातम्या