शताब्दी रुग्णालयात उभारणार ऑक्सिजन प्लान्ट

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजन तुटवडा मोठा भासत आहे. या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी चेंबूरच्या शताब्दी रुग्णालयात लवकरच ऑक्सिजन प्लान्ट उभारण्यात येणार आहे. या प्लान्टमुळे ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होऊन हजारो कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

दक्षिण-मध्य मुंबईचे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने आरसीएफ कंपनीच्या सहाय्याने येत्या दोन ते तीन आठवडय़ांत हा ऑक्सिजन प्लान्ट  शताब्दी रुग्णालयात उभारण्यात येणार आहे. याशिवाय  दक्षिण-मध्य मुंबईतील अन्य कोविड सेंटर आणि रुग्णालयांमध्ये बीपीसीएल, एचपीसीएल, इंडियन ऑइल यांच्या माध्यमातून ऑक्सिजन प्लान्ट उभे करण्यात येणार आहेत.

पूर्व उपनगरातील ‘पं. मदन मोहन मालविय शताब्दी रुग्णालया’च्या डीन डॉ. माने आणि एम पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्यासोबत झालेल्या  प्राथमिक बैठकित ऑक्सिजन प्लान्ट उभारणीच्या योजनेला तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी आरसीएफ कंपनीने सीएसआरच्या माध्यमातून मदत करण्यास तयारी दर्शविली आहे.

या प्लान्टमधून ९ किलो ऑक्सिजन असणाऱ्या १०२ सिलिंडरचा पुरवठा केला जाणार असून येत्या दोन-तीन आठवडय़ांत हा प्लान्ट कार्यन्वित केला जाणार आहे. ऑक्सिजनच्या अभावी गेल्या काही दिवसांत शताब्दी रुग्णालयातून ४४ रुग्णांना इतरत्र हलवावं लागलं होतं. 



हेही वाचा -

रेल्वेच्या 'त्या' शूर कर्मचाऱ्याला जावा कंपनीकडून ही खास भेट

मुंबईतील मशिदी कोरोना रुग्णांना पुरवत आहेत मोफत ऑक्सिजन

पुढील बातमी
इतर बातम्या