२५ नोव्हेंबरनंतर इंग्लडहून आलेल्यांनी त्वरित संपर्क साधा, नवी मुंबई पालिकेचं आवाहन

इंग्लंड आणि काही इतर देशांमध्ये नवीन प्रकारचा कोरोना विषाणू आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत इंग्लडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्यात येत आहे. 

ज्या व्यक्ती २५ नोव्हेंबरनंतर इंग्लंडवरून भारतात नवी मुंबईत आल्या आहेत अशा व्यक्तींची यादी महानगरपालिकेला प्राप्त झाली असून त्यांच्याशी संपर्क साधणं सुरू केलं आहे. त्यातूनही ज्या व्यक्ती २५ नोव्हेंबर नंतर इंग्लंडवरून नवी मुंबईत आल्या आहेत त्यांनी स्वत:हून नवी मुंबई महानगरपालिकेच्या नजिकच्या आरोग्य केंद्राशी / आरोग्य विभाग मुख्यालयाशी  अथवा १८००२२२३०९ / १८००२२२३१९ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन महापालिकेने केलं आहे. सदर व्यक्तींकरिता आरटी-पीसीआर चाचणी सुविधा एमजीएम रूग्णालय, सेक्टर ३०, सानपाडा,वाशी येथे करण्यात आलेली आहे.

मागील काही दिवसांपासून दैनंदिन कोरोना बाधितांच्या संख्येत घट होताना दिसत असली तरी नागरिकांनी सावधगिरी बाळगून मास्कचा नियमित वापर, सोशल डिस्टन्सींग आणि वारंवार हात धुणे या कोरोनापासून बचावाच्या त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. सुरक्षा नियमांचे पालन हीच कोरोनापासून बचावाची ढाल आहे हे लक्षात घेऊन सर्व नागरिकांनी स्वत:च्या व इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केलं आहे. 


हेही वाचा -

कोरोनाबाधितांसाठी आरोग्य व्यवस्था उभारण्याकरिता महापालिकेला आतापर्यंत १,४७० कोटींचा खर्च

'फ्री' काश्मिर प्रकारणात पोलिसांकडून ‘सी’ समरी अहवाल सादर


पुढील बातमी
इतर बातम्या