Advertisement

कोरोनाबाधितांसाठी आरोग्य व्यवस्था उभारण्याकरिता महापालिकेला आतापर्यंत १,४७० कोटींचा खर्च


कोरोनाबाधितांसाठी आरोग्य व्यवस्था उभारण्याकरिता महापालिकेला आतापर्यंत १,४७० कोटींचा खर्च
SHARES

मुंबईत दाखल झालेल्या जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या धोक्यातुन मुंबईकरांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी महापालिकेनं कंबर कसली आहे. मुंबईच्या कानाकोपऱ्यातील अनेक भागात रुग्णालय, चौकशी केंद्र, विलगीकरण केंद्र उभारण्यात आलं. दरम्यान, या सर्व तसंच, कोरोना संसर्ग रोखणे आणि बाधितांसाठी आरोग्य व्यवस्था उभारण्याकरिता मुंबई महापालिकेला आतापर्यंत १,४७० कोटींचा खर्च आला आहे. महापालिकेच्या आकस्मिकता निधीमध्ये आता केवळ २९ कोटी शिल्लक राहिले आहेत.

कोरोनासंबंधी खर्चासाठी आधीच अर्थसंकल्पातून ४५० कोटींचे अंशदान घेण्यात आले असून येत्या काळात आणखी खर्च करावा लागणार असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे अर्थसंकल्पातून आणखी ४०० कोटींचे अतिरिक्त अंशदान करावे, अशी विनंती प्रशासनाने स्थायी समितीकडे केली आहे.

कोरोनामुळे मुंबई महापालिकेच्या खर्चात विशेषत: आकस्मिक निधीच्या वापरात प्रचंड वाढ झाली आहे. कोरोनासाठी केलेल्या उपाययोजनांचा खर्च या आकस्मिक निधीतून करण्यात आला आहे. हा निधी संपल्यानंतर अर्थसंकल्पाच्या शिलकीतून अतिरिक्त ४५० कोटी रुपये आकस्मिकता निधीत वळवण्यात आले आहेत. आतापर्यंत ही रक्कमही खर्च झाली असून आता या शिलकीतून आणखी ४०० कोटी आकस्मिकता निधीत वळते करावेत अशी मागणी वित्त विभागाने स्थायी समितीकडे के ली आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठवण्यात आला आहे. या आठवड्यात होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत त्यावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. आधीच पालिकेचे उत्पन्न घसरलेले असताना दुसरीकडे खर्च वाढत चाललेला आहे. त्यामुळे स्थायी समिती यावर कोणता निर्णय घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

महापालिकेच्या आकस्मिकता निधीमध्ये चालू आर्थिक वर्षांच्या सुरुवातीला ८५२.५७ कोटी रुपये निधी शिल्लक होता. राज्य सरकारकडून कोरोनाच्या खर्चासाठी ६० कोटींचा निधी देण्यात आला होता. तसेच २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात आकस्मिकता निधीसाठी ३०० कोटींची तरतूद करण्यात आली होती.

या एकूण १२१२ कोटींपैकी ११८२ कोटी आधीच खर्च झाले आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या १६४४ कोटी रुपये शिलकीतून ४५० कोटी आकस्मिकता निधीतून आधीच प्रशासनाने वळते केले व तेदेखील खर्च झाले आहेत. आता त्यातून आणखी ४०० कोटी रुपये आकस्मिकता निधीत वळते करावेत, अशी मागणी प्रशासनाने के ली आहे.

कोरोनाच्या प्रसारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता विविध रुग्णालये, २४ विभाग कार्यालये यांना विलगीकरण कक्ष उभारणे, औषधोपचार, उपकरणे खरेदी, अलगीकरण कक्षासाठी कं त्राट पद्धतीने खासगी डॉक्टरांची नियुक्त, चाचण्या, प्रयोगशाळांची क्षमता वाढविणे, नवीन प्रयोगशाळा स्थापन करणे आदी कामांसाठी हा निधी खर्च केला आहे.

आकस्मिक निधीचा जमा-खर्च

जमा

  • ८५२.५७ कोटी आकस्मिकता निधीमध्ये १ एप्रिल २०२० ची शिल्लक
  • ६० कोटी करोनासाठी राज्य सरकारकडून प्राप्त झालेली रक्कम
  • ३०० कोटी अर्थसंकल्पात आकस्मिक निधीला दिलेले अंशदान
  • ४५० कोटी आकस्मिक निधीला दिलेले अतिरिक्त अंशदान

खर्च

  • १४७०.९५ कोटी कोविडसाठी झालेला खर्च
  • १६१.६९ कोटी कोविडव्यतिरिक्त झालेला खर्च
  • २९.९३ कोटी आकस्मिक निधीमध्ये शिल्लक
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा