जे. जे. हॉस्पिटलची बत्तीगुल

  • मुंबई लाइव्ह टीम & मंगल हनवते
  • आरोग्य

कधी सबस्टेशनमध्ये बिघाड झाल्यानं तर कधी थोड्याशा पावसाच्या साईडईफेक्टनं गेल्या आठवड्याभरापासून मुंबईकर अंधाराचा अनुभव घेत आहेत. त्यातच आता जे जे रुग्णालयातही शुक्रवारपासूनच अंधार पसरला आहे. सकाळी नऊ वाजता जे. जे. मधील बाह्यरूग्ण विभागा (ओपीडी) तील वीजपुरवठा खंडित झाला असून त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.

जेजेत अंधार

मुंबईतीलच नव्हे तर देशातील सर्वात मोठं सरकारी रुग्णालय अशी जे. जे. हाॅस्पिटलची ओळख आहे. तर विविध आजारांवर योग्य ते उपचार आणि आवश्यक त्या सुविधा इथं पुरवण्यात येत असल्यानं राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण इथं उपचारासाठी येतात. त्यातच जे. जे.च्या बाह्यरुग्ण विभागामध्ये नेहमीच रुग्णांची खच्चून गर्दी असते. अशावेळी शुक्रवारी एेन गर्दी असताना बाह्यरुग्ण विभागाचा वीजपुरवठा खंडित झाला नि अंधार पसरला.

आणि वीजपुरवठा सुरू

बत्तीगुल झाल्यानं डाॅक्टर, कर्मचारी आणि रुग्णांची चांगलीच तारांबळ उडाली. रुग्णांचे प्रचंड हाल सुरू झाले. वीजपुरवठा खंडित होण्याचं नेमकं कारण समजलं नाही. पण वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर तात्काळ हाॅस्पिटल प्रशासनाने आवश्यक त्या हालचाली सुरू केल्या आणि तब्बल अडीच तासांनंतर, साडे अकरा वाजता वीजपुरवठा पुर्ववत झाला. वीजपुरवठा सुरू झाल्यानं डाॅक्टर, रुग्ण आणि कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडत रुग्णावर उपचार सुरू केले. पण इतक्या मोठ्या हाॅस्पिटलमध्ये अशाप्रकारे सुविधांचा बोजवारा उडाल्यानं जे. जे. हाॅस्पिटलच्या प्रशासनावर मोठी टीका होत आहे.


हेही वाचा -

दुसऱ्या पावसाने केली मुंबईकरांची बत्तीगुल

पुढील बातमी
इतर बातम्या