रुग्णाच्या डोळ्याला उंदराचा चावा, ट्रॉमा रुग्णालयातील प्रकार

  • मुंबई लाइव्ह टीम & भाग्यश्री भुवड
  • आरोग्य

महापालिकेच्या रुग्णालयात पुन्हा एकदा रुग्णाला उंदीर चावल्याचा प्रकार समोर आला आहे. जोगेश्वरीतील महापालिकेच्या बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात एका रुग्णाच्या डोळ्याला उंदीर चावला आहे.

साफसफाईसाठी हलवलं जनरल वॉर्डमध्ये

२७ वर्षीय परविंदर गुप्ता यांच्यावर ट्रॉमातील आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. परविंदर गुप्ता हे कोमात असल्यामुळे त्यांना आयसीयूत ठेवण्यात आलं होतं. पण, साफ-सफाईचं काम काढल्यामुळे त्यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं. मात्र, त्याचवेळी कोमात असलेल्या परविंदर यांच्या डोळ्याला उंदराने चावा घेतल्याचं परविंदरचे वडील रामप्रताप गुप्ता यांनी सांगितलं. पण, याबाबतची आपण कुणाकडेही तक्रार केली नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

ठाण्याच्या हायलंड या खासगी रुग्णालयात परविंदर यांच्यावर कोमावर उपचार सुरू होते. पण, बिल जास्त झाल्यामुळे कुटुंबियांनी परविंदर यांना ट्रॉमा रुग्णालयात शिफ्ट केलं.

काही दिवसांपूर्वी परविंदर यांना आयसीयूतून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं. साफ-सफाईचं काम करायचं म्हणून त्यांना शिफ्ट केलं होतं. कोमात असलेल्या परविंदर यांना डोळ्याला उंदीर चावला आहे. सकाळी ५ ते ६ दरम्यान ही घटना घडली.

रामप्रताप गुप्ता, परविंदर गुप्ता यांचे वडील

रुग्णालय प्रशासनाचा मात्र नकार

या सर्व प्रकारावर रुग्णालय प्रशासनाने मात्र बोलायला नकार देत असं काहीही घडलेलं नसल्याचं ट्रॉमाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्बन सिंग यांनी स्पष्ट केलं आहे. शिवाय, जर उंदीर चावला असता तर त्यांना इन्फेक्शन झालं असतं, असंही डॉ. सिंग यांनी स्पष्ट केलं आहे.


हेही वाचा

महापालिका रुग्णालयातलं हाऊसकिपिंग महागडं

पुढील बातमी
इतर बातम्या