कोविशिल्डच्या बूस्टर डोसला मंजुरी द्या, सीरमची DCGIकडे मागणी

कोरोनाची लस निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं कोविशिल्डला बूस्टर डोसच्या रुपात मंजुरी द्यावी अशी मागणी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडे केली आहे.

पीटीआयनं यासंदर्भात वृत्त दिलं आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविशिल्डचा तिसरा डोस बुस्टर डोस म्हणून वापर करण्यासाठी ही मंजुरी मागण्यात आली आहे.

देशात सध्या कोविशिल्डच्या डोसची उपलब्धता मुबलक प्रमाणात आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा सामना करण्यासाठी याच्या बूस्टर डोसला मंजुरी मिळावी अशी मागणी सीरमनं केली आहे.

कोरोनाचा सामना करणाऱ्या अनेक देशांनी बूस्टर डोसला मंजुरी दिली आहे. अमेरिकेसारख्या देशात २० सप्टेंबरपासून सर्व नागरिकांना कोरोनाचा बूस्टर डोस देण्यात येणार आहे. अमेरिकन सरकारनं डेल्टा व्हेरियंटच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळं हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, मुंबईत लसीकरणाच्या कार्यक्रमाची गती आणखी वाढवण्यात येत असून दोन्ही डोस झालेल्यांना बूस्टर डोस देण्याचेही नियोजन सुरु झालं आहे. त्यामुळे कोविड टास्क फोर्स आणि राज्य शासनानं बूस्टर डोससाठी केंद्राकडे शिफारस करावी अशी मागणी मुंबई महापालिकेने केली आहे.

फ्रंट लाईन वर्कर्सना बूस्टर डोस देण्याची गरज असल्याचं पालिकेचं म्हणणं आहे. मुंबईतील लसीकरण मोहिमेला सुरुवात होऊन १० महिने उलटले आहेत. त्यामुळे फ्रंट लाईन वर्कर्सच्या शरीरातील एंटीबॉडीचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा

फक्त 'हे' प्रवासी RT-PCR शिवाय प्रवास करू शकतात - राजेश टोपे

महाराष्ट्रात येताय? एका क्लिकवर जाणून घ्या सर्व गाईडलाईन्स

पुढील बातमी
इतर बातम्या