सरकारी आणि खासगी रुग्णालयांच्या गैरसोयींविरुद्ध राज्यभर आंदोलन

राज्यातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची हेळसांड होते, हे वारंवार उघड झालं आहे. याचविरोधात आता सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी येत्या 2 डिसेंबरला राज्यभरात लाक्षणिक धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

स्वाती पाटील गेल्या 7 महिन्यांपासून या गोष्टींचा पाठपुरावा करत आहेत. त्यांनी याविषयी सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यापासून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सर्वांशीच पत्रव्यवहार केला आहे. पण, अजूनही त्यांच्याकडून समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याचं सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी सांगितलं.

सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होते. जर रुग्णाला आपातकालीन परिस्थितीत शस्त्रक्रिया करायची असल्यास रुग्णालय त्यांच्याकडून जास्तीचे पैसे आकारतात. यावरच आपल्याला बंधन घालायचं आहे. त्यामुळे आम्ही राज्यभरात धरणे आंदोलन करणार आहोत.

स्वाती पाटील, सामाजिक कार्यकर्त्या

शिवाय, रुग्णालयांमध्ये औषधं मोफत देण्याचा कायदा आहे. पण, डॉक्टर बाहेरची औषधं रुग्णांना लिहून देतात. ही पण एक प्रकारची लूट आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये वशिल्याशिवाय काम होत नाही. आपण टॅक्स भरतो तो कशासाठी? असा प्रश्न ही स्वाती पाटील यांनी यावेळी केला आहे.

माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण 15 हजार रुग्णालये आहेत. त्यात सरकारी एमबीबीएस डॉक्टर्स 4876 आहेत, 346 एमडी डॉक्टर्स आहेत आणि 181 एमएस डॉक्टर्स आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात रुग्णालयांना डॉक्टर उपलब्ध होत नाहीत.

साध्या डेंग्यू, मलेरियाच्या ट्रीटमेंटसाठीही रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठवलं जातं. मग, अशा रुग्णालयांवर कोण कारवाई करणार? असा प्रश्नही स्वाती पाटील यांनी विचारला आहे.

या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी स्वाती पाटील गेल्या 7 महिन्यांपासून प्रयत्न करत आहेत. पण, आश्वासनापलीकडे त्यांना काहीच मिळालं नसल्याचं त्यांनी सांगितलं. म्हणून 2 डिसेंबरला मुंबईतील केईएम, चेंबूरच्या शताब्दी रुग्णालयात निदर्शन फलक दाखवून निषेध व्यक्त केला जाणार आहे.


हेही वाचा

शताब्दी रुग्णालयात 'उंदीर पकडो मिशन'

पुढील बातमी
इतर बातम्या