स्वाइन फ्लूचे राज्यात २४० बळी, मुंबईत ६ जणांचा मृत्यू

नोव्होंबर महिना उजाडला तरी राज्याच्या अनेक भागात पावसानं विश्रांतीचं नाव घेतलेलं नाही. या अवकाळी शेतकऱ्यांच्या पीकाचं नुकसान झालं असून, साथीच्या आजारांमध्येही प्रचंड वाढ झाली आहे. तसंच, स्वाइन फ्लूचे प्रमाणही कमी झालेले नाही. यंदा राज्यात स्वाइन फ्लूचे तब्बल २४० बळी गेले आहेत. यामध्ये सर्वाधिक नाशिकमध्ये म्हणजेच ३४ बळींची नोंद झाली आहे. त्याशिवाय, बाधित रुग्णांची संख्या राज्यात २ हजार २७१ आहे.

६ जणांचा मृत्यू

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यानंतर नागपूरमध्ये २८, अहमदनगरमध्ये २२, पुणे मनपा १९, कोल्हापूरमध्ये १६ आणि ठाणे, कल्याण येथे अनुक्रमे ११, १० अशी बळींची नोंद करण्यात आली आहे. मुंबई शहर उपनगरात स्वाइन फ्लूमुळं ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

रुग्णांची तपासणी

राज्यभरात जानेवारीपासून २७ लाख १५ हजार २७१ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये अ‍ॅसिलटॅमिवीर या गोळ्या दिलेल्या संशयित फ्लू रुग्णांची संख्या ४१ हजार ९८३ इतकी आहे, तर राज्यात सध्या रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांची संख्या २७ आहे. राज्य शासनाच्या वतीनं अतिजोखमीच्या व्यक्तींसाठी ऐच्छिक व मोफत इन्फ्ल्यूएंझा लसीकरण उपलब्ध करण्यात आले आहे.

सध्या दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीतील गरोदर महिलांसोबतच मधुमेह, उच्च रक्तदाब असणाऱ्या आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येत आहे. २०१५-१६मध्ये १ लाख १ हजार ३५६ व्यक्तींना, २०१६-१७ मध्ये ४२ हजार ४९२ व्यक्तींना ही लस देण्यात आली आहे. जानेवारी ते ३० जून, २०१८ अखेर १ लाख २८ हजार २६ व्यक्तींना लसीकरण करण्यात आलं आहे. याशिवाय, जानेवारी, २०१९ ते नोव्हेंबर या कालावधीत ६० हजार १९९ व्यक्तींना लसीकरण देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

स्वाइन फ्लूची आकडेवारी

वर्ष 
रुग्णसंख्या
मृत्यूसंख्या
२०१५ 
८५८३ 
९०५
२०१६ 
८२ 
२६
२०१७ 
६१४४ 
७७८
२०१८ 
२५९३ 
४६१
२०१९ 
२२७१ 
२४० (नोव्हेंबरपर्यंत)


हेही वाचा -

एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेवर प्रवासी नाराज

अकरा वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या


पुढील बातमी
इतर बातम्या