चालू वर्षात 382 लिटर रक्त वाया, रक्तपेढ्यांमधील भयानक स्थिती

मुंबई शहर आणि उपनगरातील 34 सरकारी आणि महापालिकेच्या रक्तपेढ्यांमधील तब्बल 1 हजार 92 युनिट्स रक्त वाया गेल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. चालू वर्षातील जानेवारी ते जून 2017 या कालावधीत जवळपास 382 लिटर रक्त वाया गेले आहे.

रक्तपेढ्यांमधील अपुऱ्या व्यवस्थापनामुळे हे रक्त वाया गेल्याचं माहिती अधिकाराच्या माध्यमातून उघड झालं आहे.

अपुऱ्या व्यवस्थापनामुळे रक्त वाया

अनेकदा रक्तपेढ्यांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक रक्ताची साठवणूक केली जाते. अशा परिस्थितीत रक्तपेढ्यांनी खासगी किंवा महापालिकेच्या पेढ्यांशी संवाद साधून हे रक्त वापरात आणलं पाहिजे. पण, संवादाच्या अभावामुळे ही बऱ्याचदा रक्त वाया गेल्याचं पहायला मिळतं.

उन्हाळा सुरू झाला की रक्ताची कमतरता मोठ्या प्रमाणात भासू लागते. म्हणून रक्तदान शिबीरं भरवली जातात. पण, त्यांची साठवणूक नीट झाली नाही तर रक्ताची वैधता कधी कधी एकाच वेळी संपते. त्यातूनही रक्त वाया गेल्याचे प्रकार दिसून येतात.

रक्तदान शिबीर राबवल्यानंतर त्या रक्ताचं संकलन झाल्यावर त्यात एचआयव्ही, मलेरिया, कावीळ, तसंच संसर्गविरहित रक्ताची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय चाचण्या केल्या जातात. चांगल्या गुणवत्तेचे रक्त क्रमवारीने साठवले जाते. ते ठरावीक मुदतीमध्ये रक्त वितरित केले गेले नाही, तर ते रक्त फेकून द्यावं लागतं.

या रक्तपेढ्यांचा परवाना रद्द होण्याची शक्यता

मुंबईतील सेंट जॉर्ज, नायर, कामा आणि व्ही. एन. देसाई या रक्तपेढ्यांच्या परवान्यांची वैधता डिसेंबरमध्ये संपणार आहे. तसंच, सर जे. जे. रुग्णालय, वांद्रे भाभा आणि टाटा रुग्णालयाच्या रक्तपेढ्यांचे परवाने नूतनीकरणाच्या प्रक्रियेत आहेत. ते जर वेळेत झाले नाही तर याही रक्तपेढ्यांचा परवाना रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

नियमानुसार,  रक्तपेढ्यांमध्ये किमान चार रक्त संक्रमण अधिकारी असणं गरजेचं असतं. पण, शहर-उपनगरातील ९ रक्तपेढ्यांमध्ये चारपेक्षा कमी रक्त संक्रमण अधिकारी असल्याचं माहिती अधिकारातून उघड झालं आहे. त्यात आयएनएचएस अश्विनी,  वांद्रे भाभा, नायर, सायन, राजावाडी, कामा, व्ही. एन. देसाई, भाभा अॅ्टोमिक रिसर्च सेंटर आणि टाटा मेमोरिअल या रक्तपेढ्यांचा समावेश आहे. या रक्तपेढ्यांमध्ये पुरेशा प्रमाणात रक्त संक्रमण अधिकारी नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

रक्तसंकलनात मुंबई आघाडीवर

गेल्या वर्षभरात झालेल्या रक्तसंकलनात मुंबईत सर्वाधिक (३ लाख ४० हजार युनिट) रक्तसंकलन करण्यात आलं. त्यानंतर पुणे(२ लाख ५० हजार), नागपूर (१ लाख २८ हजार), ठाणे (१ लाख २५ हजार) आणि सोलापूर (१ लाख ०२ हजार) या जिल्ह्यांचा क्रमांक आहे.

डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या