रक्तदान शिबिर न घेतल्यास खाजगी रुग्णालयांवर कारवाई

  Mumbai
  रक्तदान शिबिर न घेतल्यास खाजगी रुग्णालयांवर कारवाई
  मुंबई  -  

  उन्हाळा महिना सुरू झाला की अनेक रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा भासू लागतो. त्यामुळे खासगी किंवा पालिका रुग्णालयांत गेले, की नातेवाईकांना रक्तासाठी वणवण करावी लागते. हाच त्रास कमी व्हावा म्हणून खासगी रुग्णालयांत ही आवश्यकतेनुसार रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

  पण, तरीही खासगी रुग्णालयात आवश्यकतेनुसार रक्तदान शिबिरांचे आयोजन करत नसल्याने याचा त्रास रुग्णांच्या नातेवाईकांना सहन करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर आता वर्षभरातून एकदा तरी खासगी रुग्णालयांनी ऐच्छिक रक्तदान शिबिराचे आयोजन करावे, अन्यथा संबंधित रुग्णालयावर कारवाई केली जाईल, अशा निर्देशांचे लेखी पत्र राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व खासगी रुग्णालयांना पाठवले आहे.


  हेही वाचा - 

  खासगी रुग्णालयांनाही घेता येईल रक्तदान शिबीर

  हेच खरे ‘दान’शूर!


  2002 साली लागू करण्यात आलेल्या राष्ट्रीय रक्त धोरणानुसार विश्वस्त संस्थांच्या रुग्णालयांनी त्यांच्या गरजेनुसार रक्त शिबिरांचे आयोजन करून रुग्णांची निकड त्याच रक्तपेढ्यांतून पूर्ण करावी, असे निर्देश दिले होते. मात्र राज्य रक्त संक्रमण परिषदेने दिलेल्या आकडेवारीनुसार मुंबईतील 36 विश्वस्त संस्थेच्या रुग्णालयांपैकी अनेक रुग्णालयांमध्ये ऐच्छिक रक्तदानाचे प्रमाण खूपच अत्यल्प असल्याचे समोर आले आहे.

  राज्य रक्त संक्रमण परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, 2016 साली नानावटी रुग्णालयात 4,735 युनिट रक्त लागले. यातील केवळ 1018 युनिट रक्त शिबिरांद्वारे जमा करण्यात आले होते. उरलेले 3717 युनिट रक्त रुग्णांच्या नातेवाईकांकडून घेण्यात आले. यावरुन रुग्णालयात केवळ 21.50 टक्के रक्त शिबिरांद्वारे संकलित करण्यात आले असून, 79 टक्के रुग्णांना बाहेरुन रक्त आणावे लागले. प्रिन्स अली खान रुग्णालयातही 25 टक्के, एस.एल.रहेजा रुग्णालयात 28 टक्के रुग्णांच्या नातेवाईकांना रक्त बाहेरुन आणावे लागले होते. तर सैफी रुग्णालयात 55 टक्के रक्त शिबिरांच्या माध्यमातून जमा करण्यात आले होते. उरलेले 45 टक्के रक्त बाहेरच्या रक्तपेढीतून उपलब्ध करून देण्याची वेळ रुग्णांच्या नातेवाईकांवर ओढावली होती.

  अशाप्रकारे, खासगी रुग्णालये रक्तदाब शिबिरे भरवत नसल्याने रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे. पण ,रक्ताची गरज लक्षात घेता रक्ताअभावी कुठल्याही रुग्णाचा जीव जाऊ नये या अनुषंगाने आता रुग्णांना रक्तपेढीतून रक्त तातडीने उपलब्ध करून देण्यास किंवा वार्षिक रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात निष्काळजीपणा केला, तर या रुग्णालयांवर कारवाई करण्याचे संकेत राज्य आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार यांनी दिले आहेत. मात्र, 2002 साली लागू करण्यात आलेल्या राष्ट्रीय रक्त धोरणातील मार्गदर्शक सूचनेचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याचा कायद्यात अधिकार नाही. त्यामुळे कारवाई करता येत नाही. मात्र, यासंदर्भात तातडीने उपाययोजना करण्यात येईल, असेही डॉ. पवार यांनी स्पष्ट केले आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.