Advertisement

हेच खरे ‘दान’शूर!


हेच खरे ‘दान’शूर!
SHARES

14 जून हा ‘जागतिक रक्तदाता दिवस’ म्हणून संपूर्ण जगभर साजरा केला जातो. या निमित्ताने परळच्या केईएम रुग्णालयात एक कार्यक्रम हाती घेण्यात आला. ज्यात अशा पाच जणांना बोलावण्यात आलं होतं ज्यांनी आतापर्यंत 50 हून अधिक वेळा रक्तदान आणि प्लेटलेट्स दान केले आहे.

आपला देश जरी कितीही प्रगती करत असला तरी रक्तदानातून सामाजिक भावना जपताना दिसत नाही. खरंतर रक्तदान हेच श्रेष्ठदान असं म्हटलं जातं. पण, आजही तितकीशी जागृती आपल्यात नाही. त्यामुळे लोकांमध्ये समाजभावना निर्माण व्हावी या हेतून असे अनेक उपक्रम राबवले जातात.

डॉ. प्रागजी वाजा, गणेश आंबोडस्कर, संजय बापट, श्रीराम जोशी, मेहूल दोशी हे ते पाच जण आहे,त ज्यांनी आतापर्यंत 50 हून अधिक वेळा रक्तदान आणि प्लेटलेट्स दान केलं आहे. सामाजिक भावनेतून आपण हे काम करत आहोत, असं यांचं म्हणणं आहे. केईएम रुग्णालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.

आतापर्यंत मी 75 वेळा रक्तदान केलं आहे. तरुण भारत मित्र मंडळाच्या अध्यक्षतेखाली आतापर्यंत 86 वेळा रक्तदान शिबीर घेण्यात आले आहेत. तर, इंडियन मेडिकल असोसिएशन मुंबईच्या अध्यक्षतेखाली आतापर्यंत 16 शिबीरे घेण्यात आली आहेत. तरुण मित्र मंडळ हे गेली 25 वर्ष रक्तदानासाठी काम करतं. आतापर्यंत तरुण मित्र मंडळाच्या सहकार्याने दिड लाख युनिट रक्तदान करण्यात आलं आहे. रक्तदान करण्याची चावी ही देवाने मनुष्याला दिली आहे. सामाजिक भावना, प्रेम यातून मी हा पुढाकार घेतला आहे. माणसाने जीवनात एकदा तरी रक्तदान किंवा अवयव दान केलंच पाहिजे. माणसाचा आता पगार वाढलाय. पण, माणुसकी फार कमी झाली आहे. याच भावनेतून मी काम करत आहे. आणि यापुढेही करत राहणार.
डॉ. प्रागजी वाजा, रक्तदाता 

2008 पासून मी शिबीर घ्यायला सुरुवात केली. 1987 पासून मी रक्तदान करायला सुरुवात केली. वयाच्या 18 व्या वर्षांपासून मी रक्तदान करतोय. हे माझं 10 वं वर्ष आहे. आताची पिढी रक्तदान दिवस साजरा करत नाही. याच भावनेतून मी हा पुढाकार घेतला आहे. 1 ऑक्टोबर या रक्तदान दिवसाचीही मोठ्या प्रमाणात जनजागृती केली पाहिजे. म्हणजे आताच्या पिढीत रक्तदानाविषयी मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण होईल.

गणेश आंबोडस्कर, रक्तदाता 

आतापर्यंत मी 56 वेळा रक्तदान केले आहे आणि 218 वेळा प्लेटलेट्स दान केलं आहे. लोकांमध्ये जागृती नसल्याकारणाने भीती असते की कसं करायचं रक्तदान? पण, आता ही पद्धत अगदी सोपी झाली आहे. मी स्वत: बायोमेडिकल इंजिनिअर आहे. 1987 ते 1996 सालापर्यंत मी रक्तदान केलं. पण, 1996 पासून मी प्लेटलेट्स द्यायला सुरुवात केली. टाटा रुग्णालयात प्लेटलेट्स द्यायचं कारण म्हणजे टाटा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात कॅन्सर रुग्ण येतात आणि अशा रुग्णांना मोठ्या प्रमाणात प्लेटलेट्सची गरज भासते. म्हणून मी हा पुढाकार घेतला. चार दिवसांत आपल्या प्लेटलेट्स पुनरुज्जीवित होतात. म्हणून लोकांना रक्तासह प्लेटलेट्सही दान करणं तेवढंच गरजेचं आहे. पण, आपल्यामध्ये तशी भावनाच नसते. म्हणून आपण पुढाकार घेत नाही आणि दान करत नाही.

संजय बापट, रक्तदाता आणि प्लेटलेट्स डोनर

माझ्या वडिलांपासून मला दान करण्याची सवय लागली आहे. आतापर्यंत मी 70 वेळा प्लेटलेट्स दान केलं आहे. 20 ते 22 वेळा रक्तदान केलं आहे. माझ्या वडिलांनी आतापर्यंत 125 वेळा रक्तदान केलं आहे. मला रक्तदान करुन समाधान मिळतं. मला मलेरिया झाला होता, तेव्हा मी जवळपास 3 वर्ष रक्तदान किंवा प्लेटलेट्स दान केलं नव्हतं.

श्रीराम जोशी, रक्तदाता आणि प्लेटलेट्स डोनर

मी आतापर्यंत 68 वेळा रक्तदान केलं आहे. 156 वेळा प्लेटलेट्स दान केले आहेत. 2011 पासून मी प्लेटलेट्स दान करायला सुरुवात केली. गरजू लोकांना मदत करण्याच्या दृष्टीने मी हा पुढाकार घेतला आहे. खरंतर या विषयी जनजागृती केली पाहिजे. फक्त रक्तदान नाही तर प्लेटलेट्स दान करण्याचं प्रमाणही वाढलं पाहिजे. लोकांमध्ये होणारी जागरुकता ही फार महत्त्वाची आहे.

मेहुल दोशी, रक्तदाता आणि प्लेटलेट्स डोनर

या कार्यक्रमाला केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.अविनाश सुपे, आरोग्य कार्यकारी अधिकारी पद्मजा केसकर उपस्थित होते. पद्मजा केसकर यांनी देखील यावेळी रक्तदान करण्यासाठी नागरिकांना आवाहन केलं आहे. आपण सगळ्यांनी रक्तदानाच्या जागृतीसाठी प्रयत्न केले पाहिजे असं आवाहन यावेळी करण्यात आलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा