मुंबईसह (mumbai) राज्यातील महानगरांत होणारी वाहतुकीची कोंडी ही गंभीर समस्या असून, त्याबाबत राज्य सरकार गंभीर आहे. या कोंडीवर उपाय सुचविण्यासाठी गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बाल चहल यांच्या नेतृत्वाखाली राज्य पातळीवर उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
या समितीने 20 दिवसांत गृह व परिवहन विभागाला अहवाल सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली. महानगरांतील वाहतूककोंडीवर मेट्रो (minister) हा उपाय असून, हे प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात नियंत्रणात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्यातील (maharashtra) वाहतूककोंडी, चुकीची चलने, पोलिसांची कारवाई आणि मोठ्या शहरांतील प्रकल्पांसंदर्भात अर्धा तास चर्चेची सूचना मांडली होती. त्याला मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले, ते म्हणाले की, वाहतूककोंडी ही मुंबईसह सर्व महानगरांची मोठी समस्या बनली आहे.
यावर तोडगा काढण्यासाठी मागील महिन्यात तीन बैठकांचे आयोजन करण्यात आले. यात एक बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या अध्यक्षतेखाली झाली. गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बाल चहल यांच्या नेतृत्वाखाली राज्य पातळीवर उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील वाहनांची वाढती संख्या वाहतूककोंडीस कारणीभूत ठरत असल्याचे मंत्री सामंत यांनी नमूद केले. सद्यस्थितीत महाराष्ट्रात चार कोटी 95 लाख वाहनांची नोंद झाली आहे. केवळ मुंबईत दररोज 794 नव्या वाहनांची नोंद होते.
महानगरांतील वाहतूककोडींवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या शहरांत मेट्रो जाळ्याचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सामंत यांनी सांगितले.
राज्यातील मेट्रो प्रकल्पांची प्रगती सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, मुंबईत 393.76 किमी, पुण्यात 136.42 किमी आणि नागपुरात 83.82 किमी लांबीचे मेट्रो प्रकल्प साकारले जात आहेत.
हे पूर्ण झाल्यानंतर सुमारे दीड ते दोन कोटी प्रवासी दररोज मेट्रोने प्रवास करतील आणि आपसूकच महानगरातील वाहतूककोंडी कमी होईल, अशी अपेक्षा मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली.
मुंबईतील सागरी किनारा मार्गासारख्या रस्त्यामुळे शहरांतर्गत कोंडी कमी झाली आहे. हा रस्ता वसई-विरारपर्यंत नेण्याचा संकल्प आहे. इतर शहरांत रिंगरोडसुद्धा उभारले जात आहेत. तसेच, सकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत शहरांतून अवजड वाहने जाऊ नयेत, यासाठी विशेष निर्देश देण्यात आले आहेत.
त्या माध्यमातून कोंडींवर उपाय काढण्याचा प्रयत्न आहे, असेही सामंत म्हणाले. एकूणच शहरातील वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून, सर्व संबंधित मुद्दे त्या समितीत समाविष्ट केले जातील, असेही त्यांनी अधोरेखित केले.
हेही वाचा